NEET paper leak Case : दोन आठवड्यांपासून सीबीआय लातुरातच file photo
राष्ट्रीय

NEET UG Paper leak case : आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश CBI न्यायालयाने ठेवला राखून

'सीबीआय'ने जुलै महिन्यात दाखल केले होते आरोपपत्र, आता १८ नोव्‍हेंबरला होणार पुढील सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

NEET UG Paper leak case : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET UG ) पेपर लीक प्रकरणातील आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश 'राऊस अव्हेन्यू' न्यायालयाने आज (दि.२९) राखून ठेवला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात १४ जणांना आरोपी केले आहे. न्यायालय यावर १८ नोव्हेंबर रोजी आपला आदेश सुनावणार आहे.

'सीबीआय'ने जुलै महिन्यात दाखल केले होते आरोपपत्र

NEET UG पेपर लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी CBI ने मे महिन्यात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी 'सीबीआय'ने जुलै महिन्यात १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर १४ व्या आरोपी, शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात मुख्य आरोपपत्राची दखल घेतली होती.

युक्‍तीवादानंतर आरोप निश्चित करण्‍याबाबतचा आदेश ठेवला राखून

'सीबीआय'चे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी सीबीआय आणि आरोपी शेषराव बजरंग सूर्यवंशी यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश राखून ठेवला. २ सप्टेंबर रोजी सूर्यवंशीच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.CBI च्या वतीने वरिष्ठ सरकारी वकील व्ही. के. पाठक यांनी बाजू मांडली.CBI ने मुख्य आरोपपत्रात ज्या इतर १३ आरोपींची नावे दिली आहेत, त्यांच्या संदर्भातील युक्तिवाद न्यायालयाने यापूर्वीच ऐकून घेतले आहेत.

आरोपपत्रात १३ जणांचा समावेश

या प्रकरणातील इतर १३ आरोपींमध्ये मनीषा मंधारे, मनीषा संजय हवालदार, मनीषा वाघमारे, प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज रघुनाथ मोटेगावकर, डॉ. मनोज शिरुरे, तेजस हर्षद शहा, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, यश यादव, मांगीलाल बिवल, दिनेश बिवल आणि विकास बिवल यांचा समावेश आहे.

सीबीआय तपासात ठोस माहिती समोर

सीबीआय चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी शेषराव याने सह-आरोपी शुभम खैरनार याच्यासोबत गुन्हेगारी कट रचून NEET-UG 2026 परीक्षेपूर्वी काही उमेदवारांना परीक्षेतील कथित प्रश्न (जे लीक झाले होते) उपलब्ध करून दिले होते. त्या बदल्यात उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल केले होते.याव्यतिरिक्त, असेही समोर आले आहे की, आरोपीने उमेदवारांना नांदेडमधील एका घरी नेले. तेथे त्यांना NEET-UG 2026 परीक्षेतील कथित लीक झालेले प्रश्न देण्यात आले. भविष्यात पैशांची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी त्याने उमेदवारांची मूळ कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे स्वतःकडे गहाण म्हणून ठेवून घेतली होती.सीबीआयने न्यायालयात सांगितले की, अटक करण्यात आलेला आरोपी आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेला तपास सध्या एका निर्णायक टप्प्यावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT