प्रतीकात्मक छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

NEET-PG : नीट पीजी कट-ऑफमध्ये मोठी कपात; १८ हजार रिक्त जागांसाठी आता ० ते ७ पर्सेंटाइलधारकांनाही मिळणार प्रवेश!

आता ८०० पैकी वजा ४० (-४०) गुण मिळवणारे एमडी आणि एमएस कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेत होणार सहभागी

पुढारी वृत्तसेवा

NEET PG counselling

नवी दिल्ली: वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या 'नीट-पीजी' (NEET PG) परीक्षेच्या पात्रता गुणांमध्ये (Cut-off) मोठी सुधारणा करण्यात आली आहे. तब्बल १८ हजार जागा रिक्त राहिल्याने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) कट-ऑफ चक्क 'शून्य' आणि '७' पर्सेंटाइलपर्यंत खाली आणला आहे. या निर्णयामुळे आता ८०० पैकी वजा ४० (-४०) गुण मिळवणारे उमेदवारही एमडी आणि एमएस कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.

नेमका बदल काय?

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रत्येक प्रवर्गासाठी किमान गुणांची अट होती. मात्र, आता पुढील प्रमाणे बदल करण्‍यात आला आहे.

  • SC, ST आणि OBC प्रवर्ग: पात्रता निकष ० (शून्य) पर्सेंटाईल करण्यात आला आहे.

  • खुला प्रवर्ग (General): कट-ऑफ ५० पर्सेंटाईलवरून थेट ७ पर्सेंटाईलपर्यंत कमी केला आहे.

  • दिव्यांग (PwD) उमेदवार: कट-ऑफ ४५ पर्सेंटाईलवरून ५ पर्सेंटाईलवर आणला आहे.

  • या बदलामुळे आता १०३ गुण मिळवणारे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आणि ९० गुण मिळवणारे दिव्यांग उमेदवार तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. सुरुवातीच्या नियमांनुसार खुल्या प्रवर्गासाठी किमान २७६ आणि दिव्यांगांसाठी २५५ गुणांची आवश्यकता होती.

कट-ऑफ कमी करण्याचे कारण काय?

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या (MD/MS) जागा रिक्त राहू नयेत, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत, तसेच काही नवीन जागांची भर पडली आहे. या जागा भरण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

एकीकडे कमी गुण असलेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, कट-ऑफ थेट शून्यावर आणल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. "हा निर्णय वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या गुणवंत डॉक्टरांवर अन्यायकारक असून, याचा सर्वाधिक फायदा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना होईल. अत्यंत कमी किंवा उणे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश दिल्यास, भविष्यात वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि रुग्णसेवेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

लवकरच प्रवेशाच्‍या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक होणार जाहीर

'नीट-पीजी' २०२५ ची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी झाली होती आणि निकाल १९ ऑगस्टला जाहीर झाला होता. कौन्सेलिंगच्या पहिल्या दोन फेऱ्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पार पडल्या. आता मेडिकल कौन्सेलिंग कमिटी (MCC) लवकरच तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT