नवी दिल्ली : वृत्तसंस्था
'नीट-यूजी २०२६'ची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी असलेल्या तीन मराठी शिक्षकांनीच त्यांना मिळालेल्या सवलतींचा गैरफायदा घेत या पेपरफुटीमध्ये मोठी 'कामगिरी' बजावल्याचा ठपका प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आरोपपत्रात ठेवला आहे. सीबीआयने आरोपपत्रात राष्ट्रीय परीक्षा संस्थेतील (एनटीए) त्रुटींवरही बोट ठेवले असून, अशा घटना रोखण्यासाठी सविस्तर अहवाल लवकरच 'एनटीए'ला देणार आहे.
सीबीआयने दावा केला की, पेपर लीक होण्याचे मुख्य कारण 'एनटीए'च्या परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटी होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (नीट) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांनाच तिचे मराठी भाषांतराचे काम सोपवले गेले. यामुळे आरोपींना अंतिम प्रश्नपत्रिका लक्षात ठेवण्याची संधी मिळाली.
सीबीआयने अटक केलेले तिन्ही शिक्षक 'एनटीए'च्या 'पेपर सेटिंग पॅनल'चा भाग होते. या प्रकरणात अटक असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा गुरुनाथ मांडरे (भौतिकशास्त्र) आणि मनीषा संजय हवालदार (जीवशास्त्र) या तिघांनी अंतिम प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लक्षात ठेवून ते पुण्यातील आपल्या कोचिंग क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
या तिघांना प्रश्नपत्रिका अंतिम करण्यासाठी अनेक दिवस मिळाले. कारण, त्यांच्याकडे तिच्या मराठी भाषांतराची जबाबदारीही होती. याचदरम्यान त्यांनी प्रश्न लक्षात ठेवून त्यांचा संच तयार केला, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. प्रश्नपत्रिका गोपनीय राहण्यासाठी या तिघांना सुरक्षित वातावरणात ठेवले गेले. परंतु, त्यांना घरी जाण्याची व कोचिंग क्लासमध्ये शिकवण्याची परवानगी होती. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना अंतिम 'नीट' परीक्षेत येणारे प्रश्न 'महत्त्वाचे' म्हणून शिकवले.
मनीषा वाघमारेचीही मोठी भूमिका
या साऱ्यात पुण्यातील ब्यूटीशियन मनीषा वाघमारे हिची महत्त्वाची भूमिका होती. तिघांशीही ओळख असलेल्या वाघमारेने क्लासच्या विद्यार्थ्यांकडून हे प्रश्न मिळवले. टाइप करून त्यांची पीडीएफ तयार केली. ही पीडीएफ धनंजय लोखंडे याच्यापर्यंत पोहोचली. लोखंडेने लीक पेपर पुढे अनेकांना विकला. याच नेटवर्कद्वारे ही प्रश्नपत्रिका विविध राज्यांपर्यंत पोहोचली, असा ठपकाही सीबीआयने ठेवला आहे.