NEET Exam 2026 file photo
राष्ट्रीय

NEET Exam 2026: नीट परीक्षा केंद्रासाठी केवळ 'गुगल मॅप'वर अवलंबून राहू नका; 'NTA'चा विद्यार्थ्यांना महत्वाचा सल्ला

उद्या (दि. ३) होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षे (NEET)ला विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी केवळ Google Maps वर अवलंबून राहू नये.

मोहन कारंडे

NEET Exam 2026

नवी दिल्ली: उद्या (दि. ३) होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षे (NEET)ला विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी केवळ Google Maps वर अवलंबून राहू नये. तांत्रिक बिघाडांमुळे, काही केंद्रांचे स्थान नकाशांवर अस्पष्ट किंवा चुकीचे दिसू शकते; त्यामुळे, परीक्षेच्या दिवशी होणारा कोणताही विलंब टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या पत्त्याची प्रत्यक्ष जाऊन आधीच खात्री करून घ्यावी, अशी सुचना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 'एक्स' वर पोस्ट केली आहे की, "उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राचा पत्ता नीट तपासावा. काही केंद्रांचे लोकेशन गुगल मॅप्स किंवा इतर प्लॅटफॉर्मवर चुकीचे दिसत असल्याचे समोर आले आहे. कृपया केवळ मॅप पिनवर पूर्णपणे अवलंबून राहू नका."

ट्रॅफिक आणि हवामानाचा विचार करून निघा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी आपल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या संपूर्ण पत्त्याची पुन्हा खात्री करावी, परिक्षा केंद्राचे अचूक ठिकाण पाहून त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. वाहतूक, हवामानाची स्थिती (जसे की काही प्रदेशांमध्ये पाऊस) किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित विलंबाचा विचार करून, प्रवासासाठी पुरेसा अतिरिक्त वेळ राखून ठेवा. तुम्ही परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचाल याची खात्री करा.

नीट परीक्षेची वेळ

रिपोर्टिंग वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी १:३० पर्यंत.

प्रवेश बंद: दुपारी १:३० नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेची वेळ: दुपारी २:०० ते संध्याकाळी ५:२० पर्यंत.

(नोंद: परीक्षेच्या अर्धा तास आधीच प्रवेशद्वार बंद केले जातील.)

यंदा विक्रमी नोंदणी: ५८ टक्के महिला उमेदवार

यावर्षी नीट परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकूण २२,७९,७४३ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ हजारांनी वाढली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याकडे मुलींचा कल अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एकूण नोंदणीपैकी १३,३२,९२८ महिला उमेदवार असून ९,४६,८१५ पुरुष उमेदवार आहेत. म्हणजेच एकूण परीक्षार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ५८ टक्के इतके आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुलींचा सहभाग आणि निकालातील कामगिरी सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT