

मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, यंदा देशपातळीवर दहावीचा निकाल 99.18 टक्के, तर बारावीचा निकाल 99.13 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 0.11 टक्क्यांनी, तर दहावीचा निकाल 0.09 टक्क्यांनी वाढला आहे.
राज्यपातळीवरही यंदा निकाल उच्च राहिला असून महाराष्ट्रात दहावीचा निकाल 99.93 टक्के, तर बारावीचा निकाल 99.88 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुधारला असून दहावीचा निकाल 0.03 टक्क्यांनी, तर बारावीचा निकाल 0.07 टक्क्यांनी वाढला आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये देशातील मुलींनी बाजी मारली आहे. देशामध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींचा निकाल 99.46 टक्के तर बारावीमध्ये 99.48 टक्के लागला.
राज्यात दहावीच्या परीक्षेला एकूण 30 हजार 393 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल 99.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 16 हजार 181 मुले आणि 14 हजार 212 मुली होत्या. विशेष म्हणजे दहावीमध्ये मुले आणि मुली दोघांचाही निकाल समान राहिला असून दोघांनीही 99.93 टक्के इतकी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
बारावी परीक्षेत राज्यातून एकूण 4 हजार 61 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 99.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीमध्ये 1 हजार 935 मुले आणि 2 हजार 126 मुली परीक्षेला बसल्या होत्या. यामध्ये मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेत 99.95 टक्के निकाल नोंदवला असून मुलांचा निकाल 99.79 टक्के इतका आहे.
दहावीच्या एकूण 30 हजार 393 विद्यार्थ्यांपैकी 30 हजार 372 विद्यार्थी उत्तीर्ण, तर केवळ 21 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत एकूण 4 हजार 61 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 56 विद्यार्थी उत्तीर्ण, तर फक्त 5 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. इतर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांचा निकाल 99.80 टक्के, तर सर्वसाधारण गटाचा निकाल 99.96 टक्के लागला आहे. बारावीत इतर मागासवर्गीय गटातून विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के, तर सर्वसाधारण गटाचा निकाल 99.92 टक्के नोंदवण्यात आला आहे.
देशभरातून आयसीएसई परीक्षेसाठी 2 लाख 58 हजार 721 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये मुलांची संख्या 1 लाख 37 हजार 503 तर मुलींची संख्या 1 लाख 21 हजार 218 इतकी होती. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 56 हजार 590 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांची संख्या 1 लाख 36 हजार 32 (98.93 टक्के) तर मुलींची संख्या 1 लाख 20 हजार 558 (99.46 टक्के) इतकी होती.
निकालाची टक्केवारी 99.18 इतकी आहे. आयसीएसई परीक्षेत 67 विषयांचा समावेश होता, ज्यात 20 भारतीय आणि 14 परदेशी भाषा होत्या. आयएससी परीक्षेत 45 विषय घेण्यात आले, ज्यात 13 भारतीय आणि 2 परदेशी भाषा होत्या.
प्रादेशिक विभागात पश्चिम, दक्षिण विभाग आघाडीवर
आयसीएसई परीक्षेत पश्चिम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.85 टक्के राहिला, त्यानंतर दक्षिण विभाग 99.81 टक्के निकाल लागला आहे. तसेच आयएसी परीक्षेत दक्षिण विभागाने 99.87 टक्के अव्वल स्थान पटकावले आहे, तर पश्चिम विभागने दुसरा क्रमांक पटकावताना 99.55 टक्के निकाल लागला आहे.
महापालिका शाळांचा निकाल 100 टक्के
मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल यंदाही 100 टक्के लागला असून एकूण 27 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये तब्बल 6 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत विशेष यश संपादन केले. या यशात वीर खाटिकमारे याने सर्वाधिक 96.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुशल जैन (95.06 टक्के), अंशिका राणा (93.80 टक्के), रोनक परब (91.80 टक्के), राज खाटिकमारे (91.60 टक्के) आणि ओम गुप्ता (90.80 टक्के) यांनीही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. उर्वरित 21 विद्यार्थ्यांनीही समाधानकारक यश मिळवत शाळेच्या 100 टक्के निकालात मोलाचा वाटा उचलला.