NASA invites ISRO Moon Base Program : चंद्रावरील मानवाचे पहिले कायमस्वरूपी तळ (आउटपोस्ट) म्हणून संकल्पित असलेल्या नासाच्या महत्त्वाकांक्षी 'मून बेस' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेने भारताला निमंत्रित केले आहे. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी बंगळूरु येथील 'इस्रो'च्या (ISRO) मुख्यालयात झालेल्या भारत-अमेरिका 'स्पेस जॉइंट वर्किंग ग्रुप'च्या नवव्या बैठकीदरम्यान हे निमंत्रण देण्यात आले होते; मात्र याचे तपशील आता समोर आले आहेत. भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याचा हा एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अध्याय ठरू शकतो.
प्रकल्पाची पार्श्वभूमी: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय अंतराळ धोरणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नासाने २४ मार्च २०२६ रोजी आयोजित केलेल्या 'इग्निशन' कार्यक्रमादरम्यान मून बेस प्रकल्पाची घोषणा केली होती. नुकतीच ५ आणि ६ ऑगस्ट रोजी बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयात 'भारत-अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कार्यगटाची' (CSJWG) ९ वी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान नासाने इस्रोला हे निमंत्रण दिले. चंद्राचा शांततापूर्ण व शाश्वत शोध घेण्याच्या ध्येयाने झालेल्या 'आर्टेमिस करारा'च्या धर्तीवर हे निमंत्रण देण्यात आले आहे. या करारांतर्गत दोन्ही देश वैज्ञानिक डेटाचे खुले आदान-प्रदान करण्याबाबत चर्चा पुढे नेण्यास सहमत झाले आहेत, अशी माहिती अमेरिकन दूतावासाने दिली.
बैठकीत दोन्ही देशांनी भविष्यातील अंतराळ विज्ञान आणि मानवी अंतराळ उड्डाण तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला. नासा आणि इस्रोच्या संयुक्त 'निसार' (NISAR) मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणावरही या वेळी समाधान व्यक्त करण्यात आले. 'निसार' हा पृथ्वीच्या जमिनीतील आणि बर्फाच्या पृष्ठभागातील बदलांचा अचूक अभ्यास करणारा पहिला दुहेरी वारंवारतेचा (Dual-frequency) रडार उपग्रह आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या 'बाह्य अंतराळ उपक्रमांच्या शांततापूर्ण वापरासाठीच्या समिती'च्या (COPUOS) माध्यमातून अंतराळ उपक्रमांच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या कटिबद्धतेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला.या बैठकीस अंतराळ विभागाचे सचिव व्ही. नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी संबोधित केले. तर बैठकीचे सह-अध्यक्षपद इस्रोचे यु. आर. राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक एम. शंकरन, अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री वेस्ली ब्रूक्स आणि नासाच्या सह-प्रशासक कॅथलीन कारिका यांनी भूषवले होते.