Nana Patole On Delhi Blast:
दिल्ली लाल किल्ला कार ब्लास्टवर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज (दि. ११ नोव्हेबर) प्रतिक्रिया दिली. त्यांनी देश हा असुरक्षित होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं पाहिजे असं वक्तव्य केलं. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. नाना पटोले यांनी टीका करतानाच काँग्रेस अन् राहुल गांधींनी पहलगाम हल्ल्यावेळीच आम्ही सरकार सोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं हे देखील सांगितलं. ते एएनआशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही वक्तव्य केली.
नाना पटोले म्हणाले, 'आम्ही दिल्ली ब्लास्टच्या घटनेचा निषेध करतो. ज्यांनी आपल्या आप्त स्वकीयांना या ब्लास्टमध्ये गमावलं त्यांना देव यातून सावरण्याची ताकद देवो. जे देशाची सुरक्षेला धोका पोहचवतात त्यांच्याविरूद्ध कायम काँग्रेसनं आवाज उठवला आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ल्यावेळीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी अशी घटना घडते त्यावेळी आम्ही सरकारसोबत उभे असतो.
नाना पटोले पुढे म्हणाले, 'आता सरकारनं पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. मात्र भाजप सरकारनं ऑपरेशन सिंदूरच्या नावावर ज्या प्रकारे राजकारण केलं ते संपूर्ण देशानं पाहिलं आहे. मात्र यावेळी आता भाजप आणि केंद्र सरकारला उत्तर द्यावं लागेल. जर आपली राजधानी दिल्लीच सुरक्षित नसेल तर ५६ इंच छातीवाल्यांनी याचं उत्तर द्यावं. आम्हाला यात राजकारण करायचं नाहीये. देश असुरक्षित होत चालला आहे ही आमची मुख्य काळजी आहे आणि याला केंद्र सरकार जबाबदार आहे.
नाना पटोले यांनी बिहार निवडणुकीवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, 'ज्या प्रकारे बिहार निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मतदान झालं. व्हीव्हीपॅट मशिन रस्त्यावर पडलेले मिळाले. स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज थांबवण्यात आलं. देशाचे गृहमंत्री अमित शहा पटनामध्ये थांबले होते. त्यांच्या हॉटेलचे देखील सीसीटीव्ही देखील बंद करण्यात आले होते.
यावरून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे पराभूत होत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. त्यांना काही करून निवडणूक नियंत्रित करायची आहे. त्यांचा तसा प्रयत्न सुरू आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना बहूमत मिळेल हे स्पष्ट आहे. काँग्रेसला दुसऱ्या टप्प्यात जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. आज त्याबाबतचं मतदान आहे. आम्ही तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूटानच्या दौऱ्यावर आहेत. तिथे बोलताना त्यांनी दिल्लीतील कार ब्लास्ट ज्यानी कुणी केला आहे त्यांना सोडण्यात येणार नाही असं सांगितलं.