Nana Patole Rahul Gandhi Meeting
नवी दिल्ली : माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी शनिवारी (दि.२४) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली. गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणापासून अलिप्त असलेले नाना पटोले बऱ्याच कालावधीनंतर दिल्लीत आले होते.
राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला, हा दौरा देखील राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार केल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदापासून मला पदमुक्त करा, अशी विनंती पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली होती. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाले. परंतु, नाना पटोले मात्र, राज्याच्या राजकारणापासून काहीसे अलिप्त झाल्याचे चित्र होते.
एरवी रोज माध्यमांमध्ये दिसणारे नाना पटोले भंडारा गोंदियात ठाण मांडून बसले होते. त्याला स्थानिक निवडणुका आणि अन्य काही कारणेही होती. दरम्यान, नाना पटोले हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. आता त्यांना नवी जबाबदारी लवकरच मिळणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.