Mumbai Kolkata IndiGo Flight slap case
सिलचर : मुंबई-कोलकाता इंडिगो विमानात एका सहप्रवाशाने कानशिलात लगावल्याच्या कथित घटनेनंतर आसामच्या कचार जिल्ह्यातील एक तरुण बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, प्रवासी सुरक्षा आणि मानसिक आरोग्याविषयीच्या जागरूकतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संपूर्ण वादावादीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हुसैन अहमद मजुमदार या तरुणाला विमान कर्मचारी त्याच्या जागेवर घेऊन जात असतानाच एक प्रवासी त्याला मारहाण करताना दिसत आहे. या घटनेनंतर प्रवासी सुरक्षा आणि मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
हुसैन मुंबईतील एका जिममध्ये काम करत होता. तो मूळचा कछार जिल्ह्यातील कटिगोरा येथील रहिवासी असून घरी परतत असताना ही घटना घडली. कोलकात्याहून सिलचरकडे जाणाऱ्या पुढील फ्लाइटसाठी तो चढणार होता, मात्र तो तिथे पोहोचलाच नाही. त्याचे कुटुंबीय सिलचर विमानतळावर वाट पाहत होते, पण तो तिथे न आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. त्याचा फोनही बंद असून, तो मुंबईतच राहिल्याचा अंदाज आहे. त्याचे नातेवाईक जुबैरुल इस्लाम माजूमदार म्हणाले, “तो सिलचर फ्लाइटमध्ये नव्हता. आम्ही लगेच स्थानिक प्रशासन आणि सिलचर विमानतळाजवळील पोलीस ठाण्यातही गेलो, पण अजूनही कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही.”
हुसैनचे वडील अब्दुल मन्नान मजुमदार कर्करोगाशी झुंज देत आहेत, या घटनेने पूर्णपणे खचले आहेत. "तो आमच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत खूप मेहनत करत होता आणि घरी परतत होता. आज सकाळी मी तो व्हिडिओ पाहिला आणि आता माझा मुलगा कुठे आहे हेच मला माहीत नाही," असे ते म्हणाले.
इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी 'X' वर प्रतिक्रिया दिली, "आमच्या विमानात झालेल्या वादावादीच्या घटनेची आम्हाला माहिती आहे. असे गैरवर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आम्ही आमच्या प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आणि सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृतीचा तीव्र निषेध करतो. आमच्या कर्मचाऱ्यांनी स्थापित मानक कार्यप्रणालीनुसार (SOPs) कारवाई केली. संबंधित व्यक्तीला उपद्रवी ठरवून विमान उतरल्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. नियमांनुसार सर्व संबंधित नियामक संस्थांना माहिती देण्यात आली आहे. आम्ही आमच्या सर्व विमानांमध्ये सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण राखण्यासाठी कटिबद्ध आहोत."
मात्र, या स्पष्टीकरणात हुसैनला वैद्यकीय मदतीसाठी किंवा चौकशीसाठी एअरलाइन किंवा विमानतळ प्रशासनाने संरक्षणात्मक ताब्यात घेतले होते की नाही, याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्यामुळे प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.