नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत मराठवाड्याच्या विकासाबरोबर मणिपूरमधील विकासावर चर्चा झाली, अशी माहिती डॉ. अजित गोपछडे यांनी दिली. मणिपूर राज्य प्रभारी या नात्याने मणिपूरमधील प्रसिद्ध लेंग्यान शाल देऊन डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान खा. अजित गोपछडे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मराठवाड्यातील कृषी, सिंचन, रेल्वे, महामार्ग रस्ते, आरोग्यविषयक विकासकामांसंबंधात निवेदन दिले. तसेच मणिपूरचे प्रभारी म्हणून तिथल्या विकासकामांचे निवेदन दिले. सोबतच मणिपूरमधील काळा तांदूळ, संत्री यासह विविध गोष्टीही भेट दिल्या. पंतप्रधानांनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खा. अजित गोपछडे म्हणाले.
या चर्चेमध्ये देशातील राज्य सरकारांच्या पाठिंब्याने गरिबांना अवयवदान आणि किडनी दानाचा लाभ गरजूंना मिळावा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील बिलोली परिसरात केंद्रीय दुष्काळी कृषी आणि गवत संशोधन संस्थेचे कार्यालय स्थापन करण्यात यावे, मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात यावा, बोधन-लातूर रोड नवीन रेल्वे मार्ग लवकर सुरू करण्यात यावा, नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्ग निर्माण कार्य सुरु करावे, मराठवाड्यातील कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणे आणि मणिपूर राज्य सरकारच्या सहकार्याने मणिपूरच्या हस्तकला, हातमाग, काळे तांदूळ, ऑर्गेनिक फळे व भाजीपाला या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापक योजना तयार करावी, इम्फाळ ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान थेट विमानसेवा लवकरच सुरू व्हावी, नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्याचे डॉ. अजित गोपछडे म्हणाले.