

नवी दिल्ली: शनिवारी, सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
सशस्त्र सेना ध्वज दिन हा शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला सलाम करण्यासाठीचा आहे. त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देते, त्यांचे बलिदान आपल्याला नम्र करते आणि त्यांचे समर्पण आपल्याला कायम सुरक्षित ठेवते. सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान देऊया, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून केले आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान दिले, असे भारतीय लष्कराने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना उदारपणे योगदान देण्याचे आवाहन केले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, राजनाथ सिंह यांनी नागरिकांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारतेने योगदान देण्याचे आवाहन केले. सैनिकांच्या कल्याणासाठी ही देशाची सामूहिक जबाबदारी आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सैनिकांच्या शौर्याचे स्मरण केले. तसेच सैनिकांनी देशासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.