नवी दिल्ली : भारत कधीही शेजाऱ्यांचा अपमान किंवा हानी पोहोचवत नाही. मात्र, शेजारी वाईटावर उतरला असेल, तर त्याला पर्याय नाही. प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. त्यांनी ते बजावावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी दिल्लीत केले. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनीच सरसंघचालकांनी हे वक्तव्य केले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, अहिंसा आपला स्वभाव आणि मूल्य आहे. आपली अहिंसा लोकांना बदलण्यासाठी आणि अहिंसक करण्यासाठी आहे. मात्र, काही लोक सुधारणार नाहीत. काहीही केले तरी ते जगात उपद्रव करतील. आमचा कोणीही शत्रू नाही, असे ते म्हणाले. रावणाचा वध कल्याणासाठी झाला. शिवभक्त, उत्तम प्रशासक चांगल्या माणसासाठी जे पाहिजे ते सर्व गुण असलेला रावण होता. मात्र, त्याने चुकीच्या शरीर आणि बुद्धिचा स्वीकार केला. म्हणून त्याला संपवणे गरजेचे होते. रावणाचा वध ही अहिंसा आहे. गुंडागर्दी करणाऱ्यांना धडा शिकवणे हा आपला धर्म आहे, असे ते म्हणाले.
सरसंघचालक म्हणाले की, आपल्याकडे चुकीसाठी काही लोकांना थोडा दंड, काही लोकांना जास्त दंड आणि काही लोकांना दंड न देताच सुधारले जाते. कधीही शेजाऱ्यांचा अपमान आणि हानी आपण करत नाही. असे असतानाही काहीजण वाईटावर येतात त्याला पर्याय नसतो. भगवद्गीतेमध्ये अहिंसेचा उपदेश आहे. अर्जुनाने लढावे म्हणून गीतेत अहिंसेचा उपदेश आहे. संतुलन ठेवण्याची भूमिका आपल्याकडे आहे. हे संतुलन आपण विसरलो आहोत, असे ते म्हणाले.
आज जगाला एका नवीन मार्गाची आवश्यकता असल्याने सर्वसहमतीची आवश्यकता आहे, असे सरसंघचालक म्हणाले. जग दोन मार्गांचा विचार करत आहे. जगाने दोन्ही मार्गांवर पाऊल ठेवले मात्र, जगाला तिसऱ्या मार्गाची आवश्यकता होती. तिसरा मार्ग भारताकडे आहे. जगाला मार्ग दाखविण्याची जबाबदारी भारताची आहे. भारतात ही एक परंपरा आहे, असे ते म्हणाले.