Mohan Bhagwat on RSS registration : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे संघटनेची नोंदणी करावी, अशी अपेक्षा करता का?" असा सवाल करत "आम्हाला व्यक्तींची संघटना म्हणून वर्गीकृत केले आहे आणि आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत," असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आयोजित केलेल्या अंतर्गत प्रश्नोत्तर सत्रात एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. दरम्यान,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अलीकडेच आरएसएसवर बंदी घालायला हवी असे म्हटले होते. तसेच यानंतर खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सरकारी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी आरएसएसचा नोंदणी क्रमांक आणि त्यांच्या निधीच्या स्रोतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता सरसंघचालकांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली. ब्रिटिश सरकारच्या काळात संघटनाची नोंद होतच नव्हती. तसेच स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने नोंदणी अनिवार्य केली नाही. आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएसला व्यक्तींची संघटना म्हणून संबोधले आहे. संघटनेला आयकरातून सूट देण्यात आली आहे."आमच्यावर तीनदा बंदी घालण्यात आली. म्हणून सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे. जर आम्ही तिथे नसतो तर त्यांनी कोणावर बंदी घातली?" असा सवालही सरसंघचालकांनी केला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नोंदणीकृत नाहीत. "हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही," असेही ते म्हणाले.
संघात भगव्याला गुरु मानले जात असले तरी, भारतीय तिरंग्याचा खूप आदर आहे. "आम्ही नेहमीच आमच्या तिरंग्याचा आदर करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे रक्षण करतो," असेही त्यांनी स्पष्ट केले.https://www.youtube.com/watch?v=TnEwGHy7cNk