Mohan Bhagwat on stray dogs
भुवनेश्वर/कटक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी कटकमध्ये आयोजित धार्मिक सभेत बोलताना त्यांनी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. कुत्र्यांना फक्त शेल्टर होममध्ये हलवून ही समस्या सुटणार नसून, त्यांची संख्या नियंत्रणात आणणे हाच एकमेव उपाय आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भागवत म्हणाले, "मनुष्य आणि निसर्ग यांच्यात संतुलन राहिले पाहिजे. विकास व पर्यावरण या दोन्हींचे संतुलित सहअस्तित्व आवश्यक आहे. निसर्ग रक्षण हे विकासाच्या विरोधात नाही, तर त्याचं पूरक आहे."
भागवत यांचे हे विधान सुप्रीम कोर्टाच्या अलीकडील आदेशाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते. कोर्टाने दिल्ली-NCR परिसरातील भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांत शेल्टरमध्ये हलवण्याचे आदेश दिले होते.
यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली असून, न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठाने सर्व बाजू ऐकून निर्णय राखून ठेवला आहे.
कटक येथील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये आयोजित या धार्मिक सभेत देशभरातील 500 हून अधिक संत उपस्थित होते. यावेळी दोन सत्रांमध्ये झालेल्या कार्यक्रमात भागवत यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.
त्यांनी असेही सांगितले की, "निसर्गाशी संबंधित अनेक समस्या आपल्या पारंपरिक पद्धतींनीच सोडवता येऊ शकतात. आपली संस्कृती निसर्गाशी सुसंगत आहे."
भारतीय शेतीचे कौतुक करताना भागवत म्हणाले, "भारतीय माती आजही सुपीक आहे, कारण आपले शेतकरी केवळ गरजेपुरते उत्पादन करतात. त्याउलट युरोप आणि आफ्रिकेत जास्त उत्पादनासाठी रासायनिक खतांचा अतिरेक केला जातो, ज्यामुळे मातीची गुणवत्ता नष्ट होते."
कटकमधील कार्यक्रमानंतर भागवत पुरी येथे रवाना झाले. येथे त्यांनी गोवर्धन पीठ येथे जाऊन दर्शन घेतले आणि शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेतली. या बैठकीत प्रमुख धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.
नंतर त्यांनी श्रीजगन्नाथ मंदिरात जाऊनही दर्शन घेतले. भागवत बुधवारी संध्याकाळी भुवनेश्वर येथे आले. शुक्रवारपर्यंत ते ओडिशामध्ये असून, त्यानंतर परत रवाना होणार आहेत.