Mohan Bhagwat on live-in relationship
नवी दिल्ली : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नसतात. लग्न हे केवळ शारीरिक समाधानाचे साधन नाही, तर ते समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मांडले. पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अंदमान आणि निकोबारचे लेफ्टनंट गव्हर्नर ॲडमिरल (निवृत्त) डीके जोशी उपस्थित होते. योवेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, व्यक्तीने समाजात कसे राहावे, याचे प्रशिक्षण त्याला कुटुंबातच मिळते. आपल्या संस्कृतीची परंपरा आणि संस्कार पिढ्यानपिढ्या कुटुंबाच्या माध्यमातूनच पुढे जातात. भारतामध्ये कुटुंब हे केवळ सामाजिकच नव्हे तर आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र देखील आहे. देशाची बचत आणि सोने हे कुटुंबांमध्येच राहते. सध्याच्या काळात महिलांमध्ये लग्न न करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कुटुंबाचे महत्त्व सांगताना भागवत म्हणाले की, सध्या मुलांची निश्चित संख्या किंवा लग्नाचे वय ठरवण्यासाठी कोणताही फॉर्म्युला नाही. किती मुले असायला पाहिजेत, हे कुटुंबामध्ये ठरत असते. मात्र, तीन मुले आदर्श असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तसेच लग्न १९ ते २५ वर्षांच्या वयोगटात केले जाऊ शकते. मी डॉक्टरांकडून माहिती मिळवली त्यानुसार, लग्न १९ ते २५ वयोगटात झाले आणि तीन मुले झाली तर आई-वडिल आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. मानसोपचारतज्ज्ञांनुसार, तीन मुले झाल्यास लोक ईगो मॅनेजमेंट शिकतात” असेही ते म्हणाले.