पाटणा : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लावून धरलेला मतचोरीचा मुद्दा सपशेल फेल गेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीतही कायम राहिला. संध्याकाळी आठपर्यंत घोषित झालेल्या निकालांपैकी भाजप 80, जेडीयू 67, एलजेपी 16 व राजदचे 20 उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे एआयएमआयएमने 5 जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान झाले. सरासरी 66.91 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून नवा इतिहास घडवला. गेल्या 75 वर्षांतील हा सर्वोच्च मतदानाचा विक्रम ठरला. त्यातही महिलांच्या मतदानाचा टक्का 8.80 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार याचे औत्सुक्य होते. त्यातच मतदार पुनरिक्षण मोहीम (एसआयआर) आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच विरोधकांनी रान उठविल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होणार अशी चिन्हे होती.
एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यात मत अधिकार यात्राही काढली होती. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र यात्रेत सहभागी झालेल्या या गर्दीचे मतात परिवर्तन करण्यात महागठबंधन अपयशी ठरली. मतचोरीचा मुद्दा सपशेल फेल ठरला. विशेष म्हणजे काँग्रेसने सपाटून मार खाल्ला असून पक्षाच्या अस्तित्वालाच घरघर लागली. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष अजिबात प्रभाव पाडू शकला नाही.
टपाल मतमोजणीवेळी घालमेल
शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला घेण्यात आलेल्या टपाल मोजणीमध्ये भाजप, जदयू आणि राजद यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी किमान 70 उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसू लागल्याने उमेदवारांसह नेतेमंडळींचीही घालमेल होत होती. त्यातही कधी जदयू तर कधी भाजपचे उमेदवार आघाडी घेत होते. या टप्प्यावर राजदने काही वेळा आघाडी घेतली होती. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोजपचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता.
एव्हीएमची मोजणी सुरू झाल्यानंतर मात्र भाजप-जदयूच्या उमेदवारांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली. पाठोपाठ राजदच्या उमेदवारांची आघाडीही कायम होती. दुपारी अडीचच्या सुमारास मात्र राजदची आघाडी कमालीची घटायला सुरुवात झाली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची घोडदौड सत्तास्थापनेच्या दिशेने होत गेली ती शेवटपर्यंत कायम राहिली. कल स्पष्ट होताच भाजप-जदयू उमेदवारांच्या समर्थकांनी फटाकेबाजी आणि गुलालांची उधळण करत प्रचंड जल्लोष सुरू केला.
या निवडणुकीत रालोआतील प्रमुख पक्ष भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा लढविल्या होत्या. तर एलजेपीला 29 जागा दिल्या होत्या. भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली रालोआच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरविण्यात आली होती.
बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखालील लढविण्यात येईल, अशी घोषणा भाजपने केली होती. ती कायम ठेवत भाजपने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यातच महिलांच्या खात्यात रोख दहा हजार टाकून विरोधकांच्या टीकेची धार बोथट केली. त्याची परिणती रालोआला घवघवीत यश मिळण्यात झाली.
दुसऱ्या बाजूला महागठबंधनकडून राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचाराची कमान सांभाळली होती. त्यांच्या सभा आणि रॅलींना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र हा प्रतिसाद मतांमध्ये परावर्तीत होऊ शकला नाही.
बिहार निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीपासूनच गडबड ः राहुल गांधी
बिहार निवडणुकीचा बिगूल वाजल्यापासूनच या प्रक्रियेत गडबड करण्यात आल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. बिहार निवडणुकीत काँग्रेसह महागठबंधन आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. निकालानंतर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, बिहारमधील ज्या लाखो मतदारांनी महाआघाडीवर विश्वास व्यक्त केला, त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा निकाल खरोखरच आश्चर्यकारक आहे.
ही निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. आम्हाला विजय मिळवता आला नाही. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाही वाचवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करतील, असे राहुल गांधी म्हणाले.