Meghalaya Honeymoon Murder Case
शिलाँग: मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या पतीच्या हाय-प्रोफाइल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी अटक करताना कागदपत्रांमध्ये भारतीय न्याय संहितेचे अस्तित्वात नसलेले कलम लावल्याने आरोपीला हा कायदेशीर फायदा मिळाला आहे. पोलिसांच्या या गंभीर तांत्रिक चुकीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
मे २०१५ मध्ये इंदूरच्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह झाला होता. हनिमूनसाठी हे दाम्पत्य मेघालयात गेले असता राजा रघुवंशी बेपत्ता झाला. २ जून रोजी त्याचा मृतदेह एका दरीत आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी सोनमवर पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवून तिला अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहितेची (IPC) जागा घेणाऱ्या भारतीय न्याय संहितेमध्ये खुनासाठी कलम १०३(१) लागू होते. मात्र, पोलिसांनी सोनमच्या अटक मेमो, केस डायरी आणि इतर कागदपत्रांमध्ये चुकून कलम ४०३(१) चा उल्लेख केला. विशेष म्हणजे, 'बीएनएस'मध्ये ४०३(१) नावाचे कोणतेही कलम अस्तित्वात नाही.
पोलिसांनी न्यायालयात ही केवळ टायपिंगची चूक असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत म्हटले की, "अस्तित्वात नसलेल्या कलमाचा उल्लेख केल्यामुळे आरोपीला अटकेची ठोस कायदेशीर कारणे दिली गेली नाहीत, असे मानले जाईल. त्यामुळे ही अटक कायदेशीररीत्या टिकणारी नाही."
न्यायालयाने जामीन देताना आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. सोनमला अटक केल्यानंतर गाझीपूर न्यायालयात हजर केले गेले, तेव्हा तिला वकिलांशी संपर्क साधू दिला गेल्याचा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर ती अटकेतील या तांत्रिक त्रुटींना आव्हान देऊ शकली नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने सोनम रघुवंशीला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. परवानगीशिवाय तिला शिलाँग जिल्हा सोडता येणार नाही. तपासात सहकार्य करावे लागेल.
सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी याने या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "आम्हाला जामिनाबद्दल समजले आहे, पण कोर्ट ऑर्डरची प्रतीक्षा आहे. आई-वडिलांनी तिला घरी आणायचे ठरवले, तर मी घरात राहणार नाही." यावरून हत्येच्या आरोपानंतर कुटुंबानेही तिच्यापासून अंतर राखल्याचे दिसून येत आहे.