Crime News
मेरठ: आपल्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीची तरूणाने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. उत्तर प्रदेशातील मेरठमधून ही घटना समोर आली आहे. गुलअफशान असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी सोनू (वय ३६) नावाच्या संशयीत आरोपीला अटक केली आहे.
शनिवारी सकाळी कंकरखेडा येथील एका शेतात ३५ वर्षीय गुलअफशानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मृतदेहावर शस्त्राने केलेले खोलवर वार होते, ज्यावरून ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट होत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी संशयीत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलअफशान आणि तिचा पती मोनू हे महंमदपूर गावचे रहिवासी होते. आरोपी सोनूच्या पत्नीचे मोनू याच्याशी अनैतिक संबंध होते. या दरम्यान मोनूने सोनूच्या पत्नीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ गुलअफशानच्या हाती लागला होता. या व्हिडिओच्या जोरावर गुलअफशान गेल्या काही दिवसांपासून सोनूकडे पैशांची मागणी करत होती आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती.
शुक्रवारी मुलांसाठी पुस्तके आणायला जाते, असे सांगून गुलअफशान घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या सोनूने तिला भेटीच्या बहाण्याने शेतात बोलावले. तिथे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या सोनूने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने गुलअफशानच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. प्रतिकार करताना तिचे एक बोटही कापले गेले. घटनास्थळावरील परिस्थितीवरून तिथे मोठी झटापट झाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पत्नीची बदनामी होण्याच्या भीतीने आणि सततच्या आर्थिक मागणीमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. गुलअफशानच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.