Meerut snake murder case Pudhari
राष्ट्रीय

Meerut Snake Murder Case : पत्‍नीने पतीला दिल्‍या झोपेच्या गोळ्या अन् बेडवर सोडला 'साप'; एका फोटोने 'गेम' उलटवला!

मेरठमधील चक्रावून टाकणारे हत्याकांड; क्रूर पत्नीसह प्रियकराचा भयंकर कृत्‍याचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

Meerut Snake Murder Case :

चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी एक थरारक आणि तितकीच भयानक गुन्हेगारी घटना उत्तर प्रदेशातील मेरठ (हस्तिनापुर) मधून समोर आली आहे. शाळेच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात वेड्या झालेल्या शिक्षिकेने आपल्याच पतीचा काटा काढण्यासाठी असा काही भयानक कट रचला, जो ऐकून पोलिसांचेही हादरले. इंटरनेटवर तब्बल एक वर्ष 'परफेक्ट क्राईम' कसा करायचा? याचंच रिसर्च करणाऱ्या या कलीयुगीन पत्नीने पतीला संपवण्यासाठी थेट सर्वात विषारी सापाची मदत घेतली. पण ज्या सापाने पतीचा जीव घेतला, त्याच सापाच्‍या फोटोने क्रूर पत्नीसह तिच्‍या प्रियकराला गजाआड केले आहे.

दूधात १० गोळ्या अन् बेडवर सोडला विषारी साप

बहसूमा येथील भंडोरा गावचा रहिवासी असलेला ३२ वर्षीय अतुल हा त्याची पत्नी दामिनी आणि ६ वर्षांच्या मुलासह हस्तिनापूर येथे भाड्याच्या घरात राहत होता. दोघे मिळून तिथे एक बालवाडी (स्कूल) चालवत होते. याच शाळेचा बस ड्रायव्हर तुषार याच्यासोबत दामिनीचे सूत जुळले. प्रेमातील हा सर्वात मोठा अडथळा म्हणजेच पती अतुलला कायमचे संपवण्याचा प्लॅन दामिनीने आखला.

दुधात तब्बल १० झोपेच्या गोळ्या दिल्या

घटनेच्या रात्री दामिनीने अतुलला दुधात तब्बल १० झोपेच्या गोळ्या दिल्या. अतुल गाढ झोपेत गेल्यानंतर, आधीच आणून ठेवलेला अत्यंत विषारी 'करैत' जातीचा साप अतुलच्या कपड्यांमध्ये आणि बेडवर सोडण्यात आला. सापाने अतुलला दंश केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा केवळ सर्पदंशाचा अपघात आहे, असे दाखवण्याचा दामिनीचा प्रयत्न होता.

गुगलवर शोधत होती 'पतींच्या हत्यांच्या' गुन्‍ह्यांची माहिती !

पोलीस तपासात जो खुलासा झाला तो अत्यंत धक्कादायक आहे. दामिनी गेल्या एक वर्षापासून देशभरात झालेल्या पतींच्या हाय-प्रोफाइल मर्डर्सच्या बातम्यांवर बारीक लक्ष ठेवून होती. मेरठचे प्रसिद्ध 'नीला ड्रम' हत्याकांड (सौरभ मर्डर केस), इंदूरचे राजा रघुवंशी हत्याकांड (जिथे पत्नीने मेघालयला नेऊन खून केला होता) अशा सर्व गुन्ह्यांचा माहिती दामिनी इंटरनेटवर घेत होती. जुन्या केसेसमध्ये आरोपींनी काय चुका केल्या आणि पोलीस त्यांना कसे पकडतात, याचे नोट्स ती तयार करत होती.

जुन्या गुन्ह्यांची माहिती घेतली, पण...

बहसूमा येथे अशाच एका प्रकरणात पत्नीने पतीचा गळा दाबून मारले होते. त्‍यानंतर बिनविषारी साप मृतदेहावर सोडला होता. दामिनीने यातून धडा घेतला. तिने अतुलचा गळा दाबला नाही जेणेकरून पोस्टमार्टममध्ये काही येऊ नये. तसेच, तिने सापाच्या तस्करांकडून सर्वात विषारी साप मागवला. दामिनी आणि तुषारला वाटले की ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले आहेत, पण पोलिसांच्‍या नजरेतून गुन्‍हा सुटला नाही.

एका 'फोटो'ने केला गेम ओव्हर!

साप अचानक बंद खोलीत, थेट अतुलच्या बेडपर्यंत कसा पोहोचला? हा प्रश्न पोलिसांना खटकत होता. पोलिसांनी संशयावरून दामिनीचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले, तेव्हा ड्रायव्हर तुषारसोबत तिचे तासनतास बोलणे झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ तुषारला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल जप्त केला. आणि तिथेच पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागला! तुषारच्या मोबाईलमध्ये त्याच सापाचा एका डब्यात बंद असलेला फोटो सापडला. पोलिसांनी तांत्रिक तपास करून ज्या नंबरवरून हा फोटो आला होता, त्या सोनू नावाच्या सर्पमित्राला ताब्‍यात घेतले. त्‍याला पोलिसी खाक्‍या दाखवताच आपणच तुषारला हा साप पकडून दिल्‍याचे त्‍याने कुबली दिली.

प्रेमविवाहाचा असा भयानक शेवट

दामिनीने २०१९ मध्ये अतुलसोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण दामिनीच्या दाव्यानुसार नंतर अतुल तिला त्रास देऊ लागला होता. याच दरम्यान तिचे ड्रायव्हर तुषारवर प्रेम जडले. यातूनच तिने पतीच्‍या हत्‍येचा कट रचला आणि एका कुटुंबाचा अंत झाला. सध्या पोलिसांनी दामिनी आणि प्रियकर तुषार या दोघांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT