नवी दिल्ली : वैद्यकीय उपकरणे बनविणार्या कंपन्या आता डॉक्टरांसाठी विदेश सहली आयोजित करू शकणार नाहीत. वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असून कंपन्यांकडून डॉक्टरांच्या या प्रायोजित सहली (Doctor sponsored foreign trips) अनैतिक ठरविण्यात आल्या आहेत.
कंपन्यांच्या अशा स्वरूपाच्या आयोजनांवर चाप लावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कंपन्या परदेशात डॉक्टरांसाठी कार्यशाळेच्या आयोजनाच्या नावाखाली सहली काढतात. डॉक्टरांची सर्वप्रकारे सुविधा तेथे ठेवतात. डॉक्टरांकडून या कंपन्या या मोबदल्यात फायदा उचलतात. डॉक्टर मग संबंधित कंपन्यांच्या उपकरणांची शिफारस रुग्णांसाठी करतात. कंपन्या महागड्या दरात ही उपकरणे विकतात. डॉक्टरांच्या विदेश सहलींवर कंपन्यांना आलेल्या खर्चाचा बोजा अशाप्रकारे थेट रुग्णांवर पडतो. हे पाहूनच सरकारच्या फार्मास्युटिकल्स विभागाने (डीओपी) जारी केलेल्या अधिसूचनेत मेडिकल डिव्हाईस असोसिएशन म्हणजेच चिकित्सा उपकरण संघाला उद्देशून हा गैरप्रकार थांबवण्याची सक्त ताकीद दिली आहे.
वैद्यकीय उपकरणाच्या विपणनासाठी नैतिकता समिती स्थापन करावी.
कंपन्यांनी आपापल्या उपकरणांचे नमुने सरकारकडे तपासणीस द्यावेत.
सरकारने नमुनेवाटप, संमेलने, कार्यशाळांवरील खर्चाचा तपशील द्यावा.
नियामक प्राधिकराच्या मान्यतेपूर्वी उपकरणांची जाहिरातबाजी करू नये.
उत्पादनाचा साईड इफेक्ट नाही, असा दावा कोणत्याही कंपनीने करू नये.
डॉक्टरांना वा त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्याही प्रकारची भेटवस्तू देऊ नये.