पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये एका बोगस डॉक्टरने युट्यूबर बघून शस्त्रक्रिया केल्यामुळे एका चिमुकल्या मुलाला आपला जीव गमावावा लागला आहे. एका बोगस डॉक्टरने युट्यूब व्हिडिओंवर अवलंबून राहून त्याच्या पित्त मूत्राशयातून दगड काढण्यासाठी ऑपरेशन केले. यावेळी रुग्णाची परिस्थिती बिघडल्याने 'डॉक्टरांने' त्याला पटना येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मात्र, रुग्णालयात जात असताना या मुलाचा वाटेतच मृत्यू झाला. किशोर कृष्ण कुमार (वय.15 रा. सारण, बिहार) असे मृत मुलाचे नाव आहे. यावेळी बोगस 'डॉक्टर' आणि त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी मृतदेह रुग्णालयात टाकून तेथून पळ काढला, असे मृत मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच गडखा पोलीस ठाणेही तेथे पोहोचले. आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी छपरा सदर रुग्णालयात पाठवण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, किशोर कृष्ण कुमार यांला तीव्र उलट्या होऊ लागल्याने त्यांला गणपती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला दाखल केल्यानंतर काही वेळातच उलट्या थांबल्या. मात्र, अजित कुमार पुरी नावाच्या बोगस 'डॉक्टर'ने शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचा आग्रह धरला.
यावेळी कुटुंबाने शस्त्रक्रियेची कोणतीही परवानगी दिली नव्हती. तरीही पुरी यांनी युट्य़ूब व्हिडिओ पाहून ऑपरेशन केले. शस्त्रक्रियेनंतर कृष्णाची प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी घाईघाईने त्याला पटना येथील रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. कृष्णाचे आजोबा प्रल्हाद प्रसाद शॉ म्हणाले की, ऑपरेशन दरम्यान मुलाला तीव्र वेदना जाणवू लागल्यावर, कुटुंबाने पुरी यांच्याकडे विचारपूस केली, त्यांनी त्यांच्या चिंता फेटाळून लावल्या. त्या संध्याकाळी, मुलाचा श्वासोच्छ्वास थांबला आणि सीपीआरने त्याला थोडक्यात पुनरुज्जीवित केले होते मात्र पटन्याला पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.