Tamil Nadu BSP chief Armstrong killed in Chennai
मायावतींच्या पक्षाचे तामिळनाडूचे प्रमुख आर्मस्ट्राँग यांची चेन्नईत हत्या file photo
राष्ट्रीय

तामिळनाडूमध्ये बसपाचे प्रदेशाअध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची चेन्नईत शुक्रवारी (दि.५) सायंकाळी हत्या करण्यात आली. तीन दुचाकींवर आलेल्या मारेकऱ्यांनी आर्मस्ट्राँग यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हायप्रोफाईल हत्येनंतर सक्रिय झालेल्या चेन्नई पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयीत आरोपींचे आर्कोट सुरेश टोळीशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे.

चेन्नई पोलिसांनी आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी १० विशेष पथके तयार केली आहेत. प्राथमिक तपासात हा खून जुन्या वैमनस्यातून आणि सूडभावनेतून झाल्याचे समजते. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये आर्कोट सुरेश नावाच्या हिस्ट्री शीटरची हत्या झाली होती. आर्मस्ट्राँगच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेले ८ आरोपी हे अर्कोट सुरेशचे नातेवाईक आणि टोळीतील सदस्य आहेत. त्यापैकी एक पोन्नई बाला हा अर्कोट सुरेशचा भाऊ आहे.

स्टॅलिन यांच्या विरोधात लढवली होती निवडणूक

व्यवसायाने वकील असलेल्या आर्मस्ट्राँग यांनी २००६ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना आमंत्रित केले आणि चेन्नईच्या अमिनजीकराई येथील पुल्ला रेड्डी अव्हेन्यू येथे एक भव्य रॅली आणि जाहीर सभा घेतली होती, त्यानंतर ते चर्चेत आले. २०११ मध्ये, आर्मस्ट्राँग यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, कोलाथूर मतदारसंघात द्रमुकच्या एमके स्टॅलिन यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT