Tiruvallur Train Fire Diesel tanker Southern Railway Tamil Nadu train services disrupted Chennai train cancellation
तिरुवल्लूर (तामिळनाडू) : तामिळनाडूतील तिरुवल्लूरजवळ रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या आगीत 4 ते 13 टँकर वॅगन्स जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी पहाटेच्या सुमारास ही मालगाडी तिरुवल्लूर स्थानकाजवळून जात असताना अचानक एका वॅगनमध्ये आग लागली. ही आग काही वेळातच अन्य डिझेल टँकरपर्यंत पसरली आणि आगीचे लोट व धुराचे गडद वलय परिसरात पसरले.
अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे चेन्नई-अरक्कोनम रेल्वेमार्गावरील विद्युत पुरवठा तातडीने बंद करण्यात आला, ज्याचा परिणाम थेट उपनगरी रेल्वे सेवांवर झाला आहे.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सेंट्रल येथून सुटणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत.
चेन्नई – नागरसोल एक्स्प्रेस
चेन्नई – केएसआर बेंगळुरु ब्रिंदावन सुपरफास्ट एक्स्प्रेस
चेन्नई – केएसआर बेंगळुरु डबल डेकर एक्स्प्रेस
चेन्नई – तिरुपती सप्तगिरी एक्स्प्रेस
चेन्नई – कोयंबतूर शताब्दी एक्स्प्रेस
चेन्नई – कोयंबतूर कोवई सुपरफास्ट एक्स्प्रेस
चेन्नई – म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेस
काही गाड्या थांबवण्यात/वळवण्यात आल्या आहेत-
अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या गुडूर – रेणिगुंटा मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
काही गाड्या कडंबथूर, अरक्कोनम, कटकपट्टी आदी स्थानकांवर अर्धवट थांबवण्यात आल्या आहेत.
घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), दक्षिण रेल्वेचे अधिकारी, व राज्य अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, आजूबाजूच्या घरी असलेले एलपीजी सिलेंडरही तातडीने हटवण्यात आले आहेत.
प्रवाशांसाठी हेल्पलाईन
दक्षिण रेल्वेकडून प्रवाशांना पुढील हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत:
044-25354151,
044-24354995
या आगीची नेमकी कारणमीमांसा सुरू आहे. यामध्ये रेल्वेगाडी रुळावरून घसरल्यामुळे आग लागली का, की इंधनातील तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून यावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.