मारिया कोरिना मचाडो pudhari photo
राष्ट्रीय

Maria Corina Machado : भारत महान लोकशाही देश; गांधी विचार जगासाठी आदर्श!

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मचाडो यांच्याकडून भारताचे तोंडभरून कौतुक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

व्हेनेझुएलातील लोकशाही समर्थक नेत्या आणि यंदाच्या (2025) नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या मारिया कोरिना मचाडो यांनी भारताचे तोंड भरून कौतुक केले आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे सांगत, भारत हा एक महान लोकशाही देश असून जगासाठी एक आदर्श आहे, अशा शब्दांत त्यांनी भारताचा गौरव केला आहे.

व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी दोन दशकांहून अधिक काळ लढा देणाऱ्या राजकारणी आणि कार्यकर्त्या मारिया मचाडो यांनी आपल्या भावना व्यक्त करताना गांधीजींच्या विचारांचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, शांती म्हणजे दुबळेपणा नव्हे, याचा खरा अर्थ महात्मा गांधींनी मानवतेला शिकवला. निश्चितपणे शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्याची गरज असते आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज असते.

भारत अनेक पिढ्यांसाठी आदर्श

जगामध्ये भारताचे स्थान आणि येथील लोकशाही परंपरेबद्दल बोलताना मचाडो म्हणाल्या, भारत अनेक देशांसाठी आणि पिढ्यांसाठी एक आदर्श राहिला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. याची काळजी घेणे ही तुमचीही जबाबदारी आहे. कारण जगातील अनेक देश तुमच्याकडे आशेने पाहतात. लोकशाहीला कधीही गृहीत धरता कामा नये. तिला नेहमीच अधिक मजबूत करत राहिले पाहिजे.

पंतप्रधान मोदींच्या भेटीची इच्छा

भारतासोबतच्या भविष्यातील संबंधांबद्दल त्या खूप आशावादी आहेत. व्हेनेझुएलामध्ये शांततापूर्ण लोकशाही स्थापन झाल्यानंतर अनेक आघाड्यांवर संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्या भारताकडे एक महान सहयोगी म्हणून पाहतात. मी मनापासून भारताची प्रशंसा करते. माझी मुलगी काही महिन्यांपूर्वीच भारतात येऊन गेली आणि तिला तुमचा देश खूप आवडला. मला आशा आहे की, मला पंतप्रधान मोदींशी बोलण्याची संधी मिळेल आणि एके दिवशी स्वतंत्र व्हेनेझुएलामध्ये त्यांचे स्वागत करता येईल, जेणेकरून आपण दोन्ही देशांच्या भल्यासाठी आपले संबंध अधिक मजबूत करू शकू, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

  • व्हेनेझुएलाच्या लोकशाहीवादी नेत्या गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्याने प्रेरित

  • पंतप्रधान मोदींशी चर्चेची इच्छा व्यक्त करत भविष्यातील संबंधांचे संकेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT