Indian Army War Exercise | भारताचा सीमेवर युद्ध सराव; पाकच्या काळजात धस्स

गुरुवारपासून त्रिदल दाखवणार ताकद
Indian Army War Exercise
Indian Army War Exercise | भारताचा सीमेवर युद्ध सराव
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताने पश्चिमी सीमेवर जाहीर केलेल्या 10 दिवसीय युद्धसरावामुळे पाकिस्तानच्या लष्करापासून ते सरकारपर्यंत सर्वांची झोप उडवली आहे. भारताच्या या आक्रमक तयारीमुळे पाकिस्तानने आपल्या अनेक लष्करी तुकड्या आणि तळांना हाय अलर्टवर ठेवले असून इस्लामाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भारताने लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या संयुक्त सरावासाठी 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी नोटीस टू एअरमेन जारी केला आहे. या सरावाचा मुख्य भर सर क्रीक, सिंध आणि कराची या पाकिस्तानच्या डीप साऊथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागावर आहे. या सरावाची भौगोलिक आणि सामरिक वेळ पाहता पाकिस्तानच्या दक्षिणी कमांडमध्ये घबराट पसरली आहे.

हवाई दल, नौदलास सज्ज राहण्याचे आदेश

पाकिस्तानने सिंध आणि दक्षिण पंजाबमधील आपल्या दक्षिणी कमांडला हाय अलर्ट जारी केला आहे. कोणत्याही संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दल आणि नौदलाला पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. विशेषतः पाकिस्तानच्या बहावलपूर स्ट्राईक कोअर आणि कराची (सिंध) कोअरला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शोरकोट, बहावलपूर, रहीम यार खान, जॅकोबाबाद, भोलारी आणि कराची येथील हवाई तळांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच अरबी समुद्रात गस्त वाढवण्याचे निर्देश नौदलाला देण्यात आले आहेत.

अंतर्गत समस्यांमुळे पाकिस्तान दबावाखाली

पाकिस्तानच्या लष्करावर खैबर-पेशावर भागात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा आधीच मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत भारताने बाह्य आघाडीवर निर्माण केलेल्या या दबावामुळे पाकिस्तानच्या लष्करी संसाधनांवर प्रचंड ताण आला आहे. भारताच्या या सामरिक खेळीने पाकिस्तानला पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात ढकलले आहे.

पाकिस्तानची दुखरी नस निशाण्यावर

भारत या सरावाद्वारे बहावलपूर आणि रहीम यार खानपासून ते थारचे वाळवंट आणि सर क्रीकपर्यंतच्या प्रदेशात नौदल, हवाई दल आणि भूदल यांच्यातील समन्वयाची चाचणी घेत आहे. या सरावाच्या माध्यमातून भारत कराची बंदराला धोका निर्माण करण्याची क्षमता दाखवून देत असल्याचा धसका पाकिस्तानी अधिकार्‍यांनी घेतला आहे. पाकिस्तानचा सुमारे 70 टक्के व्यापार कराची आणि बिन कासिम बंदरांमधून चालतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news