Marathi Adhikari Mahila Sahitya Sammelan Pudhari
राष्ट्रीय

Delhi Mahila Sahitya Sammelan| महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मराठी भाषा शिकणं हा खूप आनंददायी अनुभव

इतर राज्यातून आलेल्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितले अनुभव

पुढारी वृत्तसेवा

Marathi Adhikari Mahila Sahitya Sammelan

नवी दिल्ली : इतर राज्यातून येऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मराठी भाषा शिकणं हा खूप आनंददायी अनुभव होता. सुरुवातीच्या काळात काही गोष्टी कठीण वाटत होत्या. मात्र, इथली संस्कृती, लोक यांनी आम्हाला बरेच काही शिकवलं आणि आपलंसं करून घेतलं, अशा भावना मराठी अधिकारी महिला साहित्य संमेलनात "मराठीशी समरस होताना" या परिसंवादात उमटल्या.

यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत राधिका रस्तोगी, केंद्रीय नवीन व नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत सुमन रावत, महाराष्ट्र सदनाच्या विशेष आयुक्त श्वेता सिंघल सहभागी झाल्या होत्या. मंत्रालयातील उपसचिव लीना संखे आणि पुण्याच्या उपवनसंरक्षक स्नेहल पाटील यांनी अधिकाऱ्यांना बोलतं केलं.

राधिका रस्तोगी यांनी मराठी साहित्यावर भाष्य करताना म्हणाल्या की, मराठीमध्ये अतिशय अप्रतिम साहित्यकृती आहेत. “अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर” यांसारख्या अप्रतिम साहित्यकृती इतर भाषांमध्येही याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुमन रावत यांनी मराठी शिकण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीमुळे चांगलं मराठी शिकता आलं. कधी कधी शब्द सारखे असले तरी भाषेनुसार त्यांचे अर्थ बदलतात, त्यामुळे वेगवेगळे अनुभव येतात. यूपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर सुरुवातीला प्रशासकीय हिंदी शिकणे हे प्राधान्य होते, मात्र त्याचबरोबर मराठी शिकणे ही मोठी परीक्षा होती, ती चांगल्या पद्धतीने पार केली. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती अनुभवताना ‘जोगवा’ आणि ‘उंबरठा’ यांसारखे चित्रपट पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

श्वेता सिंघल यांनी भाषेसोबतच भावनांचे महत्त्व अधोरेखित केले. इतर राज्यातून महाराष्ट्रात येताना सर्व शब्द लगेच समजत नाहीत, मात्र त्यामागील भावना समजल्या की भाषा उलगडते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या कुटुंबाने मराठी संस्कृती पूर्णतः स्वीकारली असून घरात मराठी पदार्थही आवडीने बनवले जातात. आता मी उत्तर प्रदेशची कमी आणि महाराष्ट्राची जास्त झाले आहे,” असेही त्या हसत म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT