नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लुटियन्स दिल्लीतील मोतीलाल नेहरू रस्त्यावरील ३ नंबरच्या बंगल्यात मागच्या १० वर्षांहून अधिक काळ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) राहत होते. तीन एकर भूखंडामधील हा प्रशस्त बंगला आहे. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रीय राजधानीतील या पत्त्यावर डॉ. मनमोहन सिंग राहायला गेले होते.
त्याअगोदर डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान म्हणून निवासस्थान हे ७ रेसकोर्स रस्ता हे होते. जे आता ७ लोककल्याण मार्ग म्हणून ओळखले जाते, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून १० वर्षे राहिले आहेत.
३ मोतीलाल रस्ता, हे निवासस्थान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापूर्वी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे अधिकृत निवासस्थान होते. दीक्षित यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर हे घर सोडले होते. या बंगल्यात पिंपळ, जांभूळ, कडुलिंब, आंबा यासह सुमारे ४० पूर्ण वाढ झालेली झाडे आहेत. तसेच विविध पक्षी देखील बंगल्याच्या परिसरात राहतात. यामध्ये वटवाघुळांची संख्या जास्त आहे.