

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले. जागतिक कीर्तीचा अर्थतज्ज्ञ हरपला, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अशा दुर्मीळ राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी समानतेने सर्वांना हाताळले. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी, त्यांच्या निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते देशवासीयांच्या नेहमीच स्मरणात राहतील. - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग गमावले. एक ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेवर ठसा उमटवला. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधत होतो. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, देशाचे वित्तमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या दु:खाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबीयांस आणि समर्थकांना माझ्या संवेदना.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, अतुलनीय उंचीचा अर्थतज्ज्ञ गमावला.
- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात भारताचे सार्वभौमत्व मजबूत झाले. त्यांच्या अर्थशास्त्राच्या सखोल ज्ञानातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. लाखो लोक त्यांना अभिमानाने आठवतील.
- राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते
राजकारणात फार कमी लोकांना डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा सन्मान मिळाला. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी कायम प्रेरणादायी असेल.
- प्रियांका गांधी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते.
- खा. शरद पवार
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक महान, विद्वान अर्थशास्त्रज्ञ आणि स्टेटस्मन यांना गमावले. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात त्यांचे योगदान आणि 10 वर्षे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली सेवा हे सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्ताने खूप दुःख झाले. त्यांची द़ृष्टी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला कलाटणी देणारी ठरली. या कठीण काळात माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयासोबत आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री