live-in live-in relationship partner murder
उत्तर प्रदेश : दारू पिताना झालेला वाद विकोपाला गेला आणि लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका तरूणीने रागाच्या भरात पार्टनरची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना रविवारी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे उघडकीस आली. यामध्ये खून झालेला पार्टनर हा दक्षिण कोरियन नागरिक आहे. याप्रकरणी मणिपूरच्या तरूणीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
'गिम्स' रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली की, एका परदेशी नागरिकाला चाकूने भोसकलेल्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले होते, परंतु डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन तपास सुरू केला. डक जी यू असे मृत व्यक्तीचे नाव असून तो एका नामांकित मोबाईल कंपनीत 'ब्रँच मॅनेजर' म्हणून कार्यरत होता. ज्या महिलेने त्याला रुग्णालयात दाखल केले, तिचे नाव लुनजियाना पामाई असून ती मणिपूरची रहिवासी आहे. सखोल चौकशीदरम्यान तिने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने वार केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र राहत होते. तपासादरम्यान समोर आले की, शनिवारी रात्री उशिरा दोघेही मद्यपान करत होते. यादरम्यान एका कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारी दरम्यान रागाच्या भरात महिलेने त्याच्या छातीत चाकू खुपसला. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. तिने त्याला गिम्स रुग्णालयात नेले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. तपासात असेही समोर आले आहे की, या दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. मृत कोरियन नागरिक वारंवार मद्यपान करून महिलेला मारहाण करत असे, ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत. आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा त्याला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि रागाच्या भरात हे कृत्य घडले.