Manipur Violence Pudhari
राष्ट्रीय

Manipur Violence: मणिपूरमध्ये खळबळ! 28 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 6 नागा नागरिकांची हत्या; मृतदेह पाहून लोक हादरले

Manipur Naga Killings: मणिपूरमध्ये 28 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहा नागा नागरिकांचे मृतदेह कांगपोकपी जिल्ह्यात सापडल्याने तणाव वाढला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Manipur Naga Killings: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल 28 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहा नागा नागरिकांचे मृतदेह बुधवारी कांगपोकपी जिल्ह्यात सापडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागा समाजात संतापाची लाट उसळली असून अनेक भागांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील लिलोन वैफेई गावातून या सहा जणांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ते बेपत्ता होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर मणिपूर पोलिस, आसाम रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी राबवलेल्या मोठ्या शोधमोहीमेनंतर हे मृतदेह सापडले.

मणिपूरचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, जवळपास 15 पथकांनी 24 तास अखंड शोधमोहीम राबवली. त्यानंतर हे मृतदेह हाती लागले. सध्या मृतदेहांची ओळख पटविणे आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेनंतर नागा समाजाची प्रमुख संघटना 'युनायटेड नागा कौन्सिल' (UNC) आक्रमक झाली आहे. संघटनेने नागा बहुल भागांमध्ये 24 तासांच्या बंदची घोषणा केली असून राज्याच्या उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

UNC ने गंभीर आरोप करत म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन यांचे पती सेमटिनथांग किपगेन हे कुकी नॅशनल फ्रंट-पी (KNF-P) या संघटनेशी संबंधित आहेत. नागा नागरिकांच्या हत्येमध्ये या गटाचा सहभाग असू शकतो, असा संशय संघटनेने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक असल्याचा दावा नागा संघटनांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने कुकी सशस्त्र गटांसोबत केलेले 'सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स' (SoO) करार रद्द करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे मणिपूरमधील नागा आणि कुकी समुदायांमधील तणाव पुन्हा उफाळून आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात विविध समुदायांमध्ये संघर्षाच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत ही घटना शांतता प्रक्रियेला मोठा धक्का मानली जात आहे.

लियांगमाई नागा कौन्सिलचे अध्यक्ष टिमोथी यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र दु:ख व्यक्त केले. "28 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आमच्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली आहे, ते पाहून आम्ही हादरलो आहोत. हा आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी क्षण आहे," असे त्यांनी म्हटले.

13 मे रोजी कांगपोकपी भागात झालेल्या एका हिंसक घटनेनंतर परिस्थिती चिघळली होती. त्या घटनेत तीन नेत्यांची हत्या झाली होती. त्यानंतर काही नागा आणि कुकी नागरिकांना बंधक बनवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. काहींना नंतर सोडून देण्यात आले, मात्र सहा नागा नागरिकांचा काहीच मागमूस लागत नव्हता.

या घटनेवर मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या हत्याकांडाला अत्यंत दुर्दैवी म्हटले आहे. शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे प्रयत्न सुरू असताना अशी घटना घडणे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमधील परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या असून पुढील काही दिवस राज्यातील घडामोडींवर देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT