Divorce Celebration News: आजकाल घटस्फोटाचे देखील मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन होते. अनेक जोडपी सांमजस्याने विभक्त होतात तर काहींना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. असाच एक अनोखा किस्सा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील २५ वर्षच्या युवकाबाबत घडला आहे. या तरूणाने त्याचा घटस्फोट झाल्यानंतर अनोख्या पद्धतीनं परमेश्वराचे आभार मानले आहे. नुकतेच या घटस्फोटीत तरूणाने नवरात्रीच्या पवित्र सणाचा औचित्य साधून ९ किलोमीटर दंडवत यात्रा पूर्ण केली. त्याचे त्रासदायक वैवाहिक जीवन संपल्यानंतर त्याने स्थानिक मंदिरापर्यंत दंडवत यात्रा केली.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना रामनगरच्या सोनहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रविवारी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी याबाबत वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
दंडवत यात्रेत भक्त पूर्णपणे जमिनीवर झोपून साष्टांग नमस्कार घातलो. असं करत तो पुढे पुढे सरकत असतो. प्रत्येकवेळी जमिनीवर झोपून एक खूण तयार केली जाते. त्यानंतर पुढचा दंडवत त्या खुणेच्या पुढे घातला जातो.
९ किलोमीटर दंडवत घालणारा व्यक्ती हा नारखोरिया गावाचा असून त्याचे नाव जोगेश असं आहे. त्याने दंडवत घालताना पूर्ण दिवस उपवास ठेवला होता. त्याने तब्बल १२ तासांनी माता मंदिरापर्यंतीची ही दंडवत यात्रा पूर्ण केली. जोगेशने सकाळी लवकर ही यात्रा सुरू केली होती. सायंकाळपर्यंत तो मंदिरापर्यंत पोहचला. ९ किलोमीटरचं हे अंतर दंडवत घालत पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल १२ तास लागले.
जोगेश यांनी आपल्या दंडवत यात्रेवेळी जय श्री राम आणि जय बजरंगबलीचा जप देखील केली. जोगेश या दंडवत यात्रेबाबत म्हणाला की, त्याने आपले त्रासदायक वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यानंतर दंडवत घालणार अशी प्रतिज्ञा केली होती. त्याचे २०२२ मध्ये लग्न झाले होते. जोगेशने सांगितलं की त्याच्या पत्नीने त्याला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट घेण्यास भाग पाडले. जानेवारी २०२६ मध्ये त्याचा घटस्फोट मंजूर झाला.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जोगेशने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. त्याने या दंडवत यात्रेसाठी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली होती.
उप जिल्हा मॅजिस्ट्रेटने त्याची विनंती मान्य केली होती आणि त्याला पोलीस संरक्षण देखील पुरवलं होतं. पोलीस ठाणे इनचार्ज महेश सिंह यांनी सांगितलं की, आम्ही या दंडवत मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एक कॉन्स्टेबल तैनात केला होता. जोगेशचे आई वडील, भाऊ बहिणीसह कुटुंबातील सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. एवढेच नाही तर गावातील लोकं देखील त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर जमा झाले होते.
दरम्यान, जोगेशने दंडवत घालत मंदिरात पोहचल्यानंतर पूजा देखील केली. नारळ फोडला आणि आपल्या प्रतिज्ञाची सांगता केली.