Man Urinates Inside Train Coach Video Pudhari
राष्ट्रीय

Man Urinates Train Coach: गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये लघुशंका केली; प्रवासी पाहतच राहिले, विरोध करताच झाला राडा, व्हिडिओ व्हायरल

Man Urinates Inside Train Coach Video: गर्दीने भरलेल्या ट्रेनच्या डब्यात एका व्यक्तीने लघुशंका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rahul Shelke

Man Urinates Inside Train Coach Video: गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनच्या डब्यात एका व्यक्तीने लघुशंका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या वर्तनावर आणि रेल्वे डब्यांमधील स्वच्छतेच्या स्थितीवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओमध्ये ट्रेनचा डबा प्रवाशांनी पूर्ण भरलेला दिसत आहे. काही प्रवासी बर्थवर तर काही जण खाली बसलेले दिसतात. याच गर्दीत एक व्यक्ती उठून डब्यातच लघुशंका करत असल्याचे दिसत आहे. आजूबाजूला अनेक प्रवासी उभे असून ते हा प्रकार पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रवाशांनी त्या व्यक्तीला डब्यात लघुशंका न करता शौचालयाचा वापर करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर त्याने या प्रवाशांशी वाद घातल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती बिघडल्यानंतर काही प्रवाशांनी त्याला विरोध केला. व्हिडिओमध्ये काही जण त्याला मारहाण करतानाही दिसत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ @Khurpenchinfra या एक्स (X) अकाउंटवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी एक प्रश्नही उपस्थित झाला—एवढे प्रवासी समोर असताना अनेक जण फक्त हा प्रकार पाहत आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत का होते?

एका यूजरने म्हटले की, त्या व्यक्तीला रोखण्यासाठी लोकांनी लगेच हस्तक्षेप करायला हवा होता. दुसऱ्या यूजरनेही डब्यातील अनेक प्रवासी फक्त बघत का राहिले, असा सवाल केला.

या घटनेची दखल रेल्वे सेवानेही घेतली आहे. रेल्वेने संबंधित पोस्टला उत्तर देताना ट्रेन क्रमांक, PNR क्रमांक, मोबाईल नंबर तसेच घटना घडल्याची तारीख आणि वेळ अशी सविस्तर माहिती मागितली आहे. या माहितीच्या आधारे घटनेची चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल, असे रेल्वे सेवेने सांगितले आहे. प्रवाशांना रेल्वेच्या Rail मदत माध्यमातून तक्रार नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या व्हिडिओवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी संबंधित व्यक्तीच्या वर्तनावर टीका केली, तर काहींनी गर्दीच्या डब्यात अशी परिस्थिती का निर्माण झाली, यावर प्रश्न उपस्थित केले.

एका यूजरने व्हिडिओतील प्रसंगावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्या व्यक्तीला वैद्यकीय आणि कायदेशीर मदतीची गरज आहे का, हेही तपासले पाहिजे. तर काहींनी या घटनेमुळे देशाची प्रतिमा खराब होत असल्याची टीका केली.

दरम्यान, व्हिडिओ नेमका कोणत्या ट्रेनमधील आहे, घटना कधी घडली आणि संबंधित व्यक्तीविरोधात पुढे काय कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे सेवेकडून मागवण्यात आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाची पुढील चौकशी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT