प. बंगालच्‍या माजी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी.  
राष्ट्रीय

Mamata Banerjee | ममता बॅनर्जी यांचा 'लढू किंवा मरू'चा निर्धार, धरणे आंदोलनात ८० पैकी केवळ ५ आमदार हजर!

Mamata Banerjee dharna protest | तृणमूल नेत्‍यांवरील हल्‍ल्‍याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

Mamata Banerjee dharna protest

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मध्य कोलकात्यात धरणे आंदोलन करत भाजपवर तृणमूल नेत्यांवर हल्ले केल्याचा आणि पक्षाला धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. पश्‍चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींचे हे रस्त्यावरील राजकारणात पुनरागमन मानले जात आहे. मात्र, पक्षात फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान या आंदोलनाला पक्षाच्या ८० पैकी केवळ पाचच आमदारांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

तृणमूल फोडण्‍याचा भाजपचा प्रयत्‍न : ममता बॅनर्जींचा आरोप

बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या पहिल्याच मोठ्या आंदोलनाद्वारे 'स्ट्रीट फायटर' अवतारात परतलेल्या ममता बॅनर्जी यांनी "लढू किंवा मरू" असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपवर त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांवर हल्ले केल्याचा आणि त्यांना धमकावल्याचा आरोप केला. मध्य कोलकात्यात झालेल्या या धरणे आंदोलनात पक्षाच्या ८० पैकी केवळ ५ आमदार उपस्थित होते. निवडणुकीत "मते लुटल्यानंतर" आता भाजप तृणमूल काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला.

केवळ पाच आमदार आणि तीन खासदार उपस्थित

"लढेंगे या मरेंगे (मी लढेन किंवा मरेन). तुम्हा सगळ्यांना सत्तेतून बेदखल केल्याशिवाय मी मरणार नाही," अशा शब्दांत वर्षीय ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत आंदोलनस्थळी रणशिंग फुंकले. मात्र, एकीकडे ममता बॅनर्जी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्या असताना, दुसरीकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी केवळ पाच आमदार आणि तीन खासदार उपस्थित होते.कोलकात्याच्या एस्प्लानेड येथील आंदोलनस्थळी सोवनदेव चट्टोपाध्याय, नयना बॅनर्जी, मदन मित्रा, अशोक देव आणि असीमा पात्रा हे आमदार उपस्थित होते. तर खासदार डोला सेन, कल्याण बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन हे ममता बॅनर्जींच्या सोबत दिसले.

बैठकीला ८० पैकी ६० आमदारांची दांडी

सोमवारीच, पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार रीताब्रता बॅनर्जी आणि संदिपन साहा यांनी कोलकात्यातील आमदार निवासात (MLA hostel) तृणमूलच्या अनेक आमदारांची भेट घेतली. सोवनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करणाऱ्या समर्थन पत्रावर तृणमूलच्या अनेक आमदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्याच्या आरोपांनंतर या घडामोडी घडल्या आहेत. याच्या एक दिवस आधी, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला ८० पैकी ६० आमदारांनी दांडी मारली होती. त्यातच, निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेतील पीडितांची भेट घेण्यासाठी सोनारपूरला गेलेले खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दगडफेक आणि अंडीफेक करण्यात आली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तृणमूलचे फारसे नेते उघडपणे पुढे आले नाहीत. या एकामागून एक घडणाऱ्या घडामोडींमुळे तृणमूल काँग्रेसवर मोठे संकट घोंघावत असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT