Major financial scandal in Thalapati Vijay's state; 22 crores looted from government bank accounts
पुढारी ऑनलाईन :
तामिळनाडूमध्ये सरकारी बँक खात्यांतून तब्बल २२.१० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून भाजपने मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे. ही घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप करत भाजपने सरकारच्या देखरेख यंत्रणेवर आणि सरकारी निधीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बँक खात्यांतून कोट्यवधी रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. सध्या या फसवणुकीशी संबंधित व्यवहारांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात स्थानिक बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता का किंवा बँक खात्यांशी संबंधित गोपनीय माहितीचा गैरवापर करण्यात आला का, याचाही शोध घेतला जात आहे. या सायबर फसवणुकीमागे नायजेरियातील आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
भाजप नेते विनोज पी. सेल्वम यांनी या घटनेवरून तामिळनाडूतील टीव्हीके सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रशासकीय देखरेख, उत्तरदायित्व आणि सज्जतेबाबत या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सेल्वम यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सांगितले की, हा निधी ग्रामीण विकास, अत्यावश्यक सेवा आणि जनकल्याणकारी योजनांसाठी होता. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वापरण्याकरिता सरकारकडे सोपवण्यात आलेला हा पैसा होता. असे असताना सायबर गुन्हेगारांनी सरकारी पेमेंट व्यवस्थेत घुसखोरी कशी केली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात त्यांना यश कसे मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारी यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना विनोज पी. सेल्वम यांनी आर्थिक व्यवहारांची पडताळणी, आर्थिक नियंत्रण आणि व्यवहारांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे होती, असा सवाल केला. एवढी मोठी रक्कम बँक खात्यांतून काढली जाणे ही सरकारच्या व्यवस्थेतील त्रुटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या मते, हा केवळ ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार नसून सरकारी निधीची सुरक्षितता आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाशी संबंधित गंभीर मुद्दा आहे. दरम्यान, ही रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळवण्यात आली आणि या गुन्ह्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. बँकेशी संबंधित गोपनीय माहितीचा गैरवापर झाला असण्याची शक्यताही तपासली जात आहे.
भाजप नेते सेल्वम यांनी मुख्यमंत्री थलपती विजय यांचे समर्थक आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमवरही निशाणा साधला. जगातील प्रत्येक राजकीय पक्षाचे स्वतःचे आयटी विभाग असतात. मात्र, तामिळनाडूमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत असल्याची टीका त्यांनी केली.
पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्याचे फॅन क्लब आणि त्याची सोशल मीडिया टीम केवळ हॅशटॅग ट्रेंड करण्यापुरती मर्यादित न राहता राज्य सरकार चालवण्याच्या भूमिकेत दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला. सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड करणे आणि एखाद्या राज्याचा कारभार सांभाळणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूला पारदर्शकपणे उत्तरे देणारे सरकार, सक्षम संस्था आणि सर्वसामान्यांच्या पैशाचे संरक्षण करणारी मजबूत यंत्रणा आवश्यक असल्याचे सेल्वम यांनी म्हटले आहे.