Mahindra XUV 7XO
नवी दिल्ली: महिंद्रा लवकरच मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने बहुप्रतिक्षित नवीन एसयूव्ही XUV 7XO चा पहिला अधिकृत टीझर जारी केल्यानंतर आता प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही एसयूव्ही ५ जानेवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे दाखल होणार असून प्री-बुकिंग १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. यासाठी ग्राहकांना २१,००० रूपये टोकन रक्कम भरावी लागेल.
XUV 7XO ही SUV महिंद्राच्या अत्यंत यशस्वी XUV700 चे पुढचे मॉडेल आहे. महिंद्राने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, XUV 7XO च्या बाहेरच्या डिझाइनमध्ये बदल केले आहेत. पुढील बाजूस नवीन L-आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRL) आणि प्रोजेक्टर हेडलाइट्स लक्ष वेधून घेतात. मागील बाजूसही L-आकाराचे LED टेल लाइट्स देण्यात आले आहेत. या बदलांमुळे नवीन XUV 7XO पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक स्टायलिश दिसत आहे.
ग्राहक कोणत्याही महिंद्रा डीलरशिप किंवा कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे XUV 7XO ची प्री-बुकिंग करू शकतात. बुकिंगच्या वेळी, खरेदीदार त्यांच्या पसंतीच्या डीलरशिप, इंधन प्रकार आणि ट्रान्समिशनची निवड करू शकतील. XUV 7XO पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असेल, प्रत्येकी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असेल.
XUV 7XO मध्ये फीचर्सच्या बाबतीत कंपनीने खूप काळजी घेतली आहे. ग्राहकांना लक्झरी अनुभव देण्यासाठी यात अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ADAS (Advanced Driver-Assistance Systems) सुरक्षा फीचर्स, आकर्षक पॅनोरॅमिक सनरूफ आणि उत्कृष्ट अशी ऑडिओ सिस्टम आहे. कारच्या आत ट्रिपल स्क्रीन सेटअप आणि पार्किंगसाठी ३६०-डिग्री कॅमेरा आहे.