Thar accident
नवी दिल्ली: घरात नवीन वाहन खरेदी केल्यावर ते चालवायच्या आधी चाकाखाली लिंबू ठेवून तो चिरडण्याची प्रथा आहे. अशाच एका नवीन घेतलेल्या महिंद्रा थार गाडीच्या चाकाखाली लिंबू चिरडताना शोरूममध्ये अपघात झाला. शोरूमच्या पहिल्या मजल्यावर 'लिंबू विधी' करताना गाडी थेट काच फोडून खाली कोसळली. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून, चालक असलेल्या महिलेचा जीव थोडक्यात वाचला.
दिल्लीतील निर्माण विहार भागात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. तब्बल १५ लाख रुपये किंमतीची नवी कोरी महिंद्रा थार शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून काच फोडून थेट खाली कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २९ वर्षीय महिलेने नुकतीच १५ लाख रुपयांची थार एसयूव्ही खरेदी केली होती. गाडीची पूजा करण्यासाठी ती पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये पती आणि शोरूम कर्मचाऱ्यांसोबत गेली होती. शुभ मुहूर्तावर गाडीच्या चाकाखाली लिंबू चिरडण्याचा विधी सुरू असताना, महिलेने अचानक ॲक्सिलेटरवर पाय ठेवला. गाडी वेगात पुढे गेल्याने, तिने बाल्कनीची रेलिंग आणि काचेची भिंत तोडली. त्यानंतर गाडी सुमारे १५ फूट खाली कोसळली. या घटनेत गाडी पूर्णपणे उलटली. सुदैवाने, गाडीतील कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र थार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात गाडी उलटी पडलेली दिसत असून, आजूबाजूला काचेचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.