Traditional Maharashtrian Sarees
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात गुरुवारी 'महाराष्ट्र साडी प्रदर्शना'चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि कलाकुसरीचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलेलाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. गुरुवारपासून (१९ मार्च) सुरू झालेले हे प्रदर्शन २२ मार्च पर्यंत असणार आहे.
'महाराष्ट्र साडी प्रदर्शना'चे उद्घाटन 'आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन'च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या हातमाग विभागाच्या विकास आयुक्त डॉ. एम. बीना, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला, अभिनेत्री सायली भगत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत्या. या प्रदर्शनात अस्सल पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी आणि आकर्षक हॅन्ड पेंटेड साड्या तसेच कोल्हापुरी चप्पल आणि विविध पारंपरिक हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स आहेत. महाराष्ट्र सदनामार्फत आयोजित या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रदर्शनाला भेट देणारे दिल्लीतील मराठी डॉ. प्रथमेश पाटील आणि डॉ. निवेदिता ठाकरे म्हणाल्या की, यानिमित दिल्लीतील मराठी लोकांना महाराष्ट्रात तयार झालेल्या पैठणी, इर्कल, कोसा, हिमरू, खण अशा विविध प्रकारच्या साड्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत. पाहताक्षणी आवडाव्या, सर्व प्रकारच्या कार्यक्रमात परिधान करता येतील अशा आणि कॅज्युअल टू पार्टीवेअर तसेच किफायतशीर भावात साड्या उपलब्ध आहेत. साड्यांना अनुरूप दागिणे, पर्स देखील आहेत.
या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलेला ग्राहकांचे मोठे पसंती मिळत आहे. दक्ष भगत आणि कुटुंबीय ३५ वर्षापासून दिल्लीत पादत्राणे विकण्याच्या व्यवसाय करतात. यामध्ये कोल्हापुरी चपलेला वर्षभर मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. गरजेनुसार आम्ही वर्षभर कोल्हापुरातून मूळ कोल्हापुरी चप्पल मागवतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.