सागरी मासळी उत्पादनात महाराष्ट्राची मात्र 47 टक्क्यांनी मोठी झेप! (Pudhari File Photo)
राष्ट्रीय

Maharashtra Fish: सागरी मासळी उत्पादनात महाराष्ट्राची 47 टक्क्यांनी मोठी झेप!

Marine Catch Statistics | देशाच्या सागरी मासळी उत्पादनात 2024 मध्ये किंचित घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

2024 Marine Fisheries Data

कोची : देशाच्या सागरी मासळी उत्पादनात 2024 मध्ये किंचित घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने (सीएमएफआरआय) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, यावर्षी देशभरात एकूण 34.7 लाख टन सागरी मासळी पकडण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत ती 2 टक्क्यांनी कमी आहे. या घसरणीनंतरही गुजरातने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर महाराष्ट्राच्या मासळी उत्पादनात 47 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.

गुजरात पुन्हा अव्वल, केरळ तिसर्‍या स्थानी

मासळी उत्पादनात गुजरात राज्याने 7.54 लाख टन उत्पादनासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (6.79 लाख टन) आणि केरळ (6.10 लाख टन) यांचा क्रमांक लागतो. देशभरात पकडल्या गेलेल्या मासळीमध्ये ‘बांगडा’ हा मासा सर्वाधिक लोकप्रिय ठरला असून, त्याचे उत्पादन 2.63 लाख टन झाले आहे. त्यानंतर ‘तारळी’ या माशाचे 2.41 लाख टन उत्पादन झाले. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत या दोन्ही प्रमुख माशांच्या उत्पादनात घट नोंदवण्यात आली आहे.

यावर्षी ‘डाना’, ‘रेमल’ आणि ‘आसना’ यांसारख्या चक्रीवादळांमुळे मासेमारीच्या दिवसांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे एकूण उत्पादनात घट झाल्याचे सीएमएफआरआयच्या अहवालात म्हटले आहे. पश्चिम किनारपट्टीवर उत्पादनात घट झाली असली तरी पूर्व किनारपट्टीवर वाढ दिसून आली.

या सर्वेक्षणासाठी संस्थेने देशभरातील सुमारे 2.5 लाख मासेमारी सफरींचा अभ्यास केला. यातून असे दिसून आले की, यांत्रिकी बोटींना प्रत्येक सफरीत सरासरी 2,959 किलो, तर पारंपरिक मच्छीमारांच्या मोटारयुक्त बोटींना 174 किलो मासळी मिळाली. केरळमध्ये तारळीच्या दरात झालेली मोठी उलथापालथ हे या वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले, जिथे सुरुवातीला 350-400 रुपये किलो असलेला हा मासा नंतर केवळ 20-30 रुपयांवर आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT