महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतात.  (Image source- X)
राष्ट्रीय

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार; महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोणाकडे?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis) भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) बनू शकतात. भाजप पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. असे वृत्त फ्री प्रेस जर्नलने भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभरात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच याबाबत माहिती देण्यात आल्याचे वृत्तात पुढे म्हटले आहे.

पीए मोदींची फडणवीसांसोबत बंददाराआड चर्चा

नुकत्याच झालेल्या नीती आयोगाच्या अधिकृत बैठकीनंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासीत राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दरवाजाआड चर्चा केली.

पीएम मोदी- फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

या भेटीनंतर फडणवीस कुटुंबीयांनी पंतप्रधानांसोबत फोटोही घेतला. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून नवी दिल्लीला नेण्याचा निर्णय पीएम मोदी आणि फडणवीस यांच्यात बैठकीत घेण्यात आला आणि यावर पुढील काही दिवसांत पक्षांतर्गत मते जाणून घेण्यावर चर्चा झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच?

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचा भाजप पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ काही आठवड्यांपूर्वीच संपला आहे. त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेतृत्व कोणाकडे असेल?, हा आता पक्षांतर्गत चर्चेचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहतील आणि त्यानंतर नवी दिल्लीत जाऊन पक्षाची मोठी जबाबदारी स्वीकारतील, असा एक मतप्रवाह पक्षांतर्गत आहे.

महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्त्व कोणाकडे? तावडेंचे नाव चर्चेत

दरम्यान, नवी दिल्लीतील ताज्या घडामोडीवरुन असे संकेत मिळत आहेत की फडणवीस हे अपेक्षेपेक्षा लवकर नवी दिल्लीत जाऊ शकतात. महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्त्व कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भाजपचे पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव पुढे येत आहे. दरम्यान, भाजपमधील सूत्रांनी महाराष्ट्रात नेतृत्त्व कोणाकडे? याची पुष्टी केलेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT