नवी दिल्ली: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नितीन गडकरींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खासदार कल्याण काळे म्हणाले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड, खासदार कल्याण काळे, खासदार शिवाजी काळगे, खासदार रवींद्र चव्हाण यांच्या शिष्टमंडळांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. या यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही एका शिष्टमंडळाद्वारे नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले की, देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात.
त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात यावी तसेच ही मागणी फक्त आर्थिक मदतीची नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कोट्यावधी अनुयायांच्या भावनांचा सन्मान करणारी आहे. आमच्या या मागणीवर नितीन गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्या म्हणाल्या.