Love Marriage Astrology Controversy
बंगळूरु : एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या २७ वर्षीय इंजिनिअर तरुणीने, ज्योतिषाने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल केलेल्या नकारात्मक भाकितामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. बेंगळुरूच्या बागलागुंटे परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, विद्याज्योत असे मृत तरुणीचे नाव असून ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनिअर तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होती. गेल्या काही काळापासून ती घरूनच काम करत होती. विद्याज्योतचे कोडगु येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबांनी आनंदाने संमती दिली होती आणि लग्नाची तयारीही सुरू होती.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी विद्याज्योत एका ज्योतिषाचा सल्ला घेण्यासाठी गेली होती. या ज्योतिषाने "तुझे लग्न केवळ दोनच वर्षे टिकेल आणि त्यानंतर तुमचा घटस्फोट होईल," असे भाकीत वर्तवले. या भाकितामुळे विद्याज्योत प्रचंड तणावाखाली आणि नैराश्यात होती. या ग्रहांचा अडथळा दूर करण्यासाठी ज्योतिषाने तिला नऊ दिवसांचा एक विशेष विधी (पूजा) करण्याचा सल्ला दिला होता. विद्याज्योतने श्रद्धेपोटी हा विधी सुरू केला होता.
शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) नऊ दिवसांच्या विशेष धार्मिक विधीचा शेवटचा दिवस होता. कुटुंबातील सर्व सदस्य विधीचा भाग म्हणून मंदिरात जाण्याची तयारी करत होते. यावेळी विद्याज्योत घरात एकटीच होती. कुटुंबीय तिला बोलवण्यासाठी गेले असता, ती आपल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
बागलागुंटे पोलिसांनी या प्रकरणी 'अनैसर्गिक मृत्यू' अशी नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सुशिक्षित तरुणांनी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.