Delhi Mahipalpur Blast Near Radisson Hotel: दिल्लीच्या महिपालपूर परिसरात आज गुरुवारी (13 नोव्हेंबर) सकाळी रॅडिसन हॉटेलच्या जवळ मोठ्या स्फोटासारखा आवाज ऐकू आला, ज्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. लगेच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
मात्र, दिल्ली पोलिसांनी नंतर स्पष्ट केले की हा कोणताही स्फोट नव्हता, तर एक डीटीसी (DTC) बसचा मागील टायर फुटल्याने मोठा आवाज झाला. तपासादरम्यान घटनास्थळी काहीही संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, परिसराची सखोल तपासणी केल्यानंतर कुठलेही विस्फोटक साहित्य किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. स्फोटासारखा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली होती. पोलिस आणि तपास यंत्रणांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व भाग सुरक्षित असल्याची खात्री केली.
डीसीपी साउथ वेस्ट यांच्या माहितीनुसार, गुरुग्रामकडे जात असलेल्या एका व्यक्तीनेच स्फोटाच्या आवाजाबाबत पहिला फोन केला होता. तपासात उघड झाले की, धौळा कुआं दिशेने जाणाऱ्या एका डीटीसी बसचा टायर फुटल्याने हा मोठा आवाज झाला होता. स्थानिक सुरक्षा रक्षकांनी देखील हीच माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातील सर्व चौक आणि संवेदनशील ठिकाणी कडक तपासणी सुरू केली आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे आणि सुरक्षा यंत्रणा सतत लक्ष ठेवून आहेत.