Gujarat Lion Attack Pudhari
राष्ट्रीय

Lion Attack: 12 वर्षीय मुलाला सिंहाने जंगलात ओढून नेलं; यात्रेदरम्यान घडली धक्कादायक घटना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Gujarat Lion Attack: गुजरातमधील गिरनार येथील अंबाजी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेदरम्यान 12 वर्षीय मुलावर सिंहाने हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Gujarat Lion Attack: गुजरातमधील गिरनार पर्वतावरील अंबाजी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेदरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्या दिशेने चढाई सुरू केल्यानंतर अवघ्या 50 पायऱ्या चढताच एका 12 वर्षीय मुलावर सिंहाने हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून, प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यात्रेचा मुख्य मार्ग तातडीने बंद केला आहे.

मृत मुलाचे नाव मयूर चौहान (वय 12) असून तो गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मोडाज गावचा रहिवासी होता. तो आपल्या कुटुंबासह गिरनार येथील अंबाजी मंदिराच्या दर्शनासाठी आला होता.

अंधाराचा फायदा घेत सिंहाचा हल्ला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे 5.45 वाजता 50 ते 60 भाविक मंदिराकडे निघाले होते. मुख्य प्रवेशद्वारापासून अवघ्या 50 पायऱ्या चढल्यानंतर अचानक अंधारातून सिंह बाहेर आला आणि मयूरवर मागून झडप घातली.

मुलाच्या काकांनी सांगितले की, सिंहाने मयूरचा हात पकडला आणि क्षणात त्याला जंगलाच्या दिशेने ओढून नेले. भाविकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सिंह जंगलात अदृश्य झाला होता.

जंगलात आढळले अवशेष

घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस, ट्रॅकर्स आणि पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शोधमोहीमेनंतर जंगलातून मुलाचे बूट, कपडे आणि काही अवशेष सापडले.

वनविभागाने काही तासांत संशयित सिंहाला पकडले. पशुवैद्यकीय तपासणीदरम्यान सिंहाने उलटी केली आणि त्यामध्ये मानवी शरीराचे अवशेष आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हल्ला याच सिंहाने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अंबाजी मंदिराचा मार्ग बंद

घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून गिरनारवरील अंबाजी मंदिराकडे जाणारा नवीन पायऱ्यांचा मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. भाविकांना पर्यायी जुन्या मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वनविभागाने परिसरात पिंजरे लावून शोधमोहीम राबवली असून, संपूर्ण भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पहिल्यांदाच यात्रेकरूवर सिंहाचा हल्ला

वनविभागाच्या माहितीनुसार, गिरनारच्या अंबाजी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेदरम्यान भाविकावर सिंहाने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी गिरनार परिसरात बिबट्याने एका मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली होती, मात्र ती मंदिराच्या पायऱ्यांवर नव्हती.

स्थानिक नागरिकांनी दावा केला आहे की, गेल्या तीन दिवसांपासून हा सिंह मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाजवळ दिसत होता. मात्र वनविभागाने परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगितले आहे.

सरकारकडून चौकशीचे आदेश

गुजरातचे वन आणि पर्यावरण मंत्री अर्जुन मोढवाडिया यांनी या घटनेला अत्यंत दुर्दैवी म्हटले आहे. सिंह सहसा विनाकारण हल्ला करत नाहीत, त्यामुळे या हल्ल्यामागील कारणांचा सखोल तपास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, मानव आणि सिंह यांच्यात वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकही बोलावण्यात आली आहे.

या घटनेमुळे गिरनार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT