लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. Pudhari
राष्ट्रीय

Next Indian Army Chief : लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ होणार भारताचे नवे लष्करप्रमुख

Next Indian Army Chief : ३० जूनला जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्‍याकडून स्वीकारणार पदभार

पुढारी वृत्तसेवा

Next Indian Army Chief : केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख (Next Army Chief) म्हणून नियुक्ती केली आहे. ३० जूनपासून ते पदाची धुरा सांभाळतील. लष्कराच्या आधुनिकीकरणातील त्यांच्या योगदानासाठी ते एक अग्रगण्य जनरल ऑफिसर म्हणून ओळखले जातात.

सेठ यांचा कार्यकाळ असेल ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, " राष्ट्रपतींनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जनरल पदावर पुढील 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' (लष्करप्रमुख) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती ३० जून २०२६ पासून लागू होईल आणि ते जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील. लेफ्टनंट जनरल सेठ यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत असेल."

सेठ यांनी संभाळली अनेक महत्त्वाची पदे

लेफ्टनंट जनरल सेठ यांनी अनेक महत्त्वाच्या स्टाफ आणि धोरणात्मक पदांवर काम केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील इंडिपेंडंट आर्मर्ड ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर, अंगोलातील युनायटेड नेशन्स मिशनमध्ये ऑपरेशन्स ऑफिसर, आर्मी हेडक्वार्टरमध्ये असिस्टंट मिलिटरी सेक्रेटरी, हेडक्वार्टर साउथ वेस्टर्न कमांडमध्ये ब्रिगेडियर जनरल स्टाफ ऑपरेशन्स आणि डायरेक्टर जनरल (डिसिप्लिन, सेरेमोनियल अँड वेल्फेअर) यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासलाचे माजी विद्यार्थी

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची याच वर्षी १ एप्रिल रोजी 'वाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ' (VCOAS) म्हणजेच उप-लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची चीफ ऑफ आर्मी स्टाफ (लष्करप्रमुख) या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली आहे. सेठ हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९८६ मध्ये ते 'आर्मर्ड कोअर'मध्ये कमीशन झाले होते. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव सुमारे चार दशकांचा आहे. या काळात त्यांनी वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितींमध्ये आणि संघर्षग्रस्त भागात काम केले आहे.

लेफ्टनंट जनरल सेठ यांनी अमेरिका आणि पॅरिसमध्ये केले कोर्सेस

लेफ्टनंट जनरल सेठ यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी येथील नेव्हल पोस्टग्रेजुएट स्कूलमधून 'इंटरनॅशनल डिफेन्स एक्विझिशन मॅनेजमेंट कोर्स', पॅरिसमधील मिलिटरी कॉलेजमधून 'डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड जनरल स्टाफ कोर्स', महू येथील 'हायर कमांड कोर्स' आणि नवी दिल्लीतील 'नॅशनल डिफेन्स कॉलेज'मधून प्रशिक्षण घेतले आहे. याशिवाय, त्यांनी वाळवंटी भागातील आर्मर्ड रेजिमेंट, प्रगत भागातील आर्मर्ड ब्रिगेड आणि जम्मू-काश्मीरमधील काउंटर-इंसरजंन्सी (बंडखोरी विरोधी) फोर्सचे नेतृत्वही केले आहे.

लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ओळखले जातात धीरज सेठ

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नेहमीच एक कुशल लष्करी अधिकारी राहिले आहेत. त्यांनी व्यावसायिक लष्करी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणातील त्यांच्या योगदानासाठी ते एक अग्रगण्य जनरल ऑफिसर म्हणून ओळखले जातात. त्यांनी लष्कर मुख्यालयाच्या 'धोरणात्मक नियोजन आणि क्षमता विकास' विभागांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणाची दिशा निश्चित करण्यात, क्षमता विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आणि दीर्घकालीन लष्करी उपक्रमांना आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT