Nirmala Sitharaman On LIC Investment In Adani Group:
केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी सोमवारी अर्थमंत्रालयानं एलआयसीला अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते असं स्पष्टीकरण दिलं. हे सांगताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारी मालकीच्या एलआयसीनं अदानी ग्रुपमध्ये ज्या काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स अर्थात SOP आहेत त्यानुसारच ही गुंतवणूक केली असल्याचं देखील स्पष्ट केलं.
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी वीमा कंपनी आहे. एलआयसी ही अनेक कंपन्यांमध्ये पॉलिसीधारकांचा पैसा गुंतवत असते. ही गुंतवणूक करत असताना एलआयसी त्या कंपनीचे फंडामेंटल्स पाहते. अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करताना देखील जे काही ठरलेले मापदंड आहेत त्या आधारेच गुंतवणूक करण्यात आली आहे.
एलआयसीनं अदानी ग्रुपच्या जवळपास अर्ध डझन लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. याची एकूण किंमत ही जवळपास ३८ हजार ६५८ . ८५ कोटी रूपये इतकी होते. तर ९ हजार ६२५.७७ कोटी रूपये हे डेबिट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवण्यात आले आहेत.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी एलआयसीच्या अदानी ग्रुपमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी लेखी उत्तर दिलं. यात, 'अर्थमंत्रालय एलआयसीला त्यांच्या गुंतवणूक विषयक प्रकरणात कोणतेही आदेश किंवा निर्देश देत नाही.' असं म्हटलं आहे.
निर्मला सीतारमण यांनी एलआयसी हे त्यांचे गुंतवणूक विषयक निर्णय हे त्यांच्या कडक मार्गदर्शक तत्वांच्या आधारे घेते. यावेळी जोखीम आणि विश्वासार्हता तपासून पाहिली जाते असंही सांगितलं. सीतारमण यांनी इन्श्युरन्स अॅक्ट १९३८ नुसार अशा प्रकारचे निर्णय हे घेतले जातात. त्याचबरोबर याबाबतचे नियम आयआरडीएआय (IRDAI), आरबीआय आणि सेबी वेळोवेळी लागू करत असते.