MSC Elsa 3 hazardous cargo ship with dangerous chemicals sinks Kerala coast environmental threat
तिरुवनंतपुरम : केरळच्या समुद्र किनाऱ्याजवळ MSC Elsa 3 हे लिबेरियन झेंड्याखालील मालवाहू जहाज बुडाल्याने मोठ्या पर्यावरणीय संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. या जहाजात कॅल्शियम कार्बाइडसारख्या 13 घातक कंटेनर्ससह सुमारे 84 मेट्रिक टन डिझेल असल्याची माहिती आहे.
सध्या भारतीय तटरक्षक दल आणि नौसेना बचाव कार्यात गुंतले असून, पर्यावरण आणि समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या घटनेमुळे केरळमधील जैवविविधतेने नटलेला किनारपट्टीचा परिसर आणि पर्यटन व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.
जहाजावर असलेल्या 24 खलाशांपैकी 21 जणांना आधीच वाचवण्यात आलं होतं. उर्वरित तीन जण कंपनीच्या सूचनेनुसार जहाजावरच थांबले होते, त्यांना भारतीय नौसेनेच्या INS Sujata या जहाजाच्या सहाय्याने सुखरूप वाचवण्यात आले.
MSC Elsa 3 हे जहाज शुक्रवारी विजिंजम बंदरातून निघून कोचीकडे जात होतं. त्याचवेळी जहाज 26 अंशांनी कलण्यास सुरुवात झाली होती आणि याबाबत कंपनीने तातडीची मदत मागितली होती. सुरुवातीला जहाज स्थिर होईल अशी अपेक्षा होती, परंतु पाण्याचा मारा वाढल्याने जहाज बुडालं.
या 184 मीटर लांब जहाजावर एकूण 640 कंटेनर होते. यामध्ये 13 कंटेनरमध्ये धोकादायक रसायनं होती. त्यातील 12 कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाइड होतं. याशिवाय जहाजाच्या टाक्यांमध्ये 84.44 मेट्रिक टन डिझेलही साठवलेलं होतं. हे सगळं समुद्रात मिसळल्यास मोठं प्रदूषण आणि समुद्री सजीवांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनेनं मिळून बचावकार्य राबवलं. जहाजाच्या भोवती सतत पाळत ठेवण्यासाठी जहाजं आणि विमानं तैनात करण्यात आली आहेत. विशेषत: तेल गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तेल शोध प्रणाली वापरण्यात येत आहे. सध्या कोणताही तेलगळतीचा अहवाल मिळालेला नाही, असं तटरक्षक दलानं स्पष्ट केलं.
या जहाजाचे काही कंटेनर पाण्यात तरंगत आहेत आणि काही किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यामुळे इतर जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, जर किनाऱ्यावर कंटेनर किंवा तेलगळती दिसली, तर त्यांना हात न लावता त्वरित पोलीस अथवा प्रशासनाला कळवावे.
MSC Elsa 3 या जहाजाच्या बुडाल्यामुळे केवळ मानवी जीवितहानी टळली असली तरी पर्यावरणीय संकट अद्यापही संभवतं. केरळच्या जैवविविधतेने नटलेल्या किनाऱ्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
सध्या तटरक्षक दल आणि राज्य प्रशासन सर्वतोपरी दक्षता घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.