राष्ट्रीय

Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी रविवारी करणार १०० व्या वर्षात पदार्पण; भाजप मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन कार्यकर्त्यांना संबोधित करणार

पुढारी वृत्तसेवा

Lal Krishna Advani 100th Birthday : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रविवारी (दि. ८ नोव्‍हेंबर) 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात विशेष हवन, पूजा आणि प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक विधीद्वारे पक्षाचे कार्यकर्ते व नेते अडवाणी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन कार्यकर्त्यांना संबोधित करणार

८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले अडवाणी रविवारी आपल्या आयुष्याच्या १०० व्या वर्षात प्रवेश करत आहेत. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या वेळी अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली.

विशेष सादरीकरणाचे आयोजन

मुख्यालयातील हवन आणि पूजेनंतर अडवाणी यांच्या जीवनप्रवासावर आणि राजकीय कारकीर्दीवर आधारित एका विशेष सादरीकरणाचे (प्रेझेंटेशन) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले जाईल.

मागील महिन्‍यात करण्‍यात आले होते रुग्‍णालयात दाखल

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या वयामुळे अडवाणी यांच्या प्रकृतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; उपचारानंतर १९ ऑक्टोबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. याआधी मे महिन्यातही वयोमानपरत्वे उद्भवणाऱ्या तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात ठेवावे लागले होते.२०२४ या वर्षात अडवाणी यांना काही वेळा अपोलो आणि 'एम्स' रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते आणि २५ डिसेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला होता.

पंतप्रधान मोदींनी घेतली होती निवासस्‍थानी जाऊन भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर रोजी अडवाणी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पंतप्रधान म्हणून सार्वजनिक सेवेत २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी ही भेट घेतली होती. या भेटीनंतर बोलताना, "अडवाणीजींच्या दशकांच्या जनसेवेचा देशाच्या वाटचालीवर आणि राष्ट्रजीवनावर अनकट ठसा उमटला आहे," अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला होता.

भाजपच्या विस्तारात महत्त्वाचा वाटा

अडवाणी यांचा जन्म अखंड भारतातील कराची येथे झाला होता. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाचा विस्तार करण्यात अडवाणी यांची भूमिका अत्यंत निर्णायक राहिली आहे. त्यांनी तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २००२ ते २००४ या काळात त्यांनी देशाचे उपपंतप्रधानपदही भूषवले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मार्च २०२४ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अडवाणी यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT