'कुंभमेळा फेम ' मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील आज केरळ उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली.  Pudhari
राष्ट्रीय

Monalisa marriage controversy | "तुम्ही केरळमध्ये आहात हे तुमचे सुदैव" : 'कुंभमेळा फेम' मोनालिसासह पतीला हायकोर्टाचा दिलासा

केरळ उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल ठेवला राखून

पुढारी वृत्तसेवा

Monalisa marriage controversy : केरळ उच्च न्यायालयाने आज (दि. ३ ) 'कुंभमेळा फेम ' मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. आजच्‍या सुनावणीवेळी न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी तोंडी निरीक्षण नोंदवले की, हे जोडपे केरळमध्ये आहे हे त्यांचे सुदैव आहे.

"त्यामुळेच आम्ही आज जिवंत आहोत"

मध्य प्रदेशात मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान खान यांनी विवाह केला. यानंतर त्‍यांना जीवे मारण्‍याच्‍या धमक्या येत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी तोंडी निरीक्षण नोंदवले की, हे जोडपे केरळमध्ये आहे हे त्यांचे सुदैव आहे. सुदैवी आहात की तुम्ही केरळमध्ये आहात. यावर जोडप्याच्या वकिलांनी उत्तर दिले: "फक्त याच एका कारणामुळे आम्ही आज जिवंत आहोत."

मोनालिसा २०२५च्‍या कुंभमेळ्यानंतर आली होती प्रसिद्धीझोतात

२०२५ च्या कुंभमेळ्यात मण्यांच्या माळा विकतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात प्रसिद्धीझोतात आलेल्या मोनालिसाने या वर्षाच्या सुरुवातीला केरळमध्ये फरमान खानशी लग्न केले होते. मात्र, ती लग्नासाठी कायदेशीरदृष्ट्या पात्र वयापेक्षा लहान असल्याचा आरोप झाल्यानंतर या लग्नावरून मोठा गदारोळ निर्माण झाला.

लग्‍न बेकायदेशीर ठरविण्‍याचा प्रयत्‍न : मोनालिसाचे वकील

आज जोडप्याची बाजू मांडणारे वकील एम. शशींद्रन यांनी युक्तिवाद केला की, कट्टरपंथी गट आणि मध्य प्रदेश प्रशासनाचा एक गट मोनालिसाला अल्पवयीन दाखवून हे लग्न बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. जोडप्याच्या म्हणण्यानुसार, विवाह झाला तेव्हा ती सज्ञान होती आणि त्यानंतर तिला अल्पवयीन दाखवण्यासाठी अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले.

लग्‍न कायदेशीररित्‍या टिकरणारे नाही : अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू

मध्य प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. वर मुस्लिम असूनही हे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार लावले गेले असल्याने हे लग्न कायदेशीररित्या टिकणारे नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

मोनालिसाची खरी जन्‍मतारीख डिसेंबर २००९ मधील

मोनालिसाची खरी जन्मतारीख डिसेंबर २००९ आहे, म्हणजेच लग्नाच्या वेळी ती अल्पवयीन होती आणि त्यामुळे या प्रकरणात बाल संरक्षण कायद्याच्या तरतुदी लागू होऊ शकतात. जन्म आणि विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत, खान याच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात फसवणुकीचे गुन्हेही जोडले जाऊ शकतात, असेही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले.

दोन राज्‍यांमध्‍ये समांतर सुनावणी

न्यायालयाने सरकारी पक्षाच्या युक्तिवादातील काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि नोंदवले की, कथित पीडितेने स्वतः तिच्या पतीविरुद्ध कोणतीही तक्रार केलेली नाही. मोनालिसाच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळेच नव्हे, तर केरळ आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांतील न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या समांतर सुनावणीमुळे या प्रकरणाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तिरुवनंतपुरममधील 'पॉक्सो' (POCSO) न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या एका खाजगी तक्रारीत, या विवाहाला मदत केल्याच्या आरोपावरून फरमान खान आणि सीपीआय(एम) च्या काही नेत्यांवर (ज्यामध्ये एम.व्ही. गोविंदन, व्ही. शिवनकुट्टी आणि ए.ए. रहिम यांचा समावेश आहे) कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आता बुधवारच्‍या निकालाकडे सर्वांचे लक्ष

आजच्‍या सुनावणीवेळी लग्नाबाबातची कायदेशीरबाबी , नववधूचे वय आणि या जोडप्याला सहन करावा लागत असलेला छळ यावरून रदार युक्तिवादानंतर, न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी संकेत दिले की या प्रकरणी बुधवारी आदेश जारी होण्याची शक्यता आहे.व्यक्तिगत स्वातंत्र्य, आंतरधर्मीय विवाह, वयाची निश्चिती आणि फौजदारी दायित्व हे सर्व मुद्दे या एकाच प्रकरणात एकत्र आल्यामुळे, बुधवारच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT