Kulgam Encounter File Photo
राष्ट्रीय

Kulgam Encounter : जम्‍मू काश्‍मीरमधील चकमकीत लष्कर कमांडर लतीफ भट कुलगाम चकमकीत खात्मा?

कुलगाम जिल्ह्यातील लारू भागात सुरक्षा दलांची संयुक्‍त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Kulgam encounter Latif Bhat : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लारू भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. रिपोर्टनुसार, या भागात लष्कर-ए-तोयबाचा मोस्‍ट वॉन्‍टेड कमांडर भट हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आहे. तसेच त्याचा साथीदार उमर निसार हा चकमकीत जखमी झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांच्या हाती लागल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, पोलिसांनी लतीफ भटच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही किंवा त्याच्या साथीदाराच्या अटकेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

जवानांवरील हल्‍ल्‍यानंतर सुरक्षा दलांनी राबवली विशेष मोहिम

अलीकडेच झालेल्या एका हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते. बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी कुलगाममधील अखरान गावात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका तपासणी चौकीवर (नाका पार्टी) हल्ला केला. दहशतवाद्यांनी अवघ्या १५ सेकंदात सुमारे ३० राऊंड गोळीबार केला. त्यानंतर राबवलेल्‍या मोहिमेत भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता.

मोहम्‍मद लतीफ भट होता अनेक दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये सहभागी

मोहम्मद लतीफ भट हा भारतात घडवून आणलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये कथितरीत्या सामील होता. कुलगाममध्ये अलीकडेच झालेल्या एका हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते, त्यानंतर सुरक्षा दलांनी ही मोहीम हाती घेतली. लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानला जात होता, त्याचा शोध सुरू होता.

सुरक्षा दलांना हल्लेखोरांबाबत मिळाली होती माहिती

सीआरपीएफचे विशेष महासंचालक संदीप खिरवार यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते. यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. चकमकीपूर्वीच सुरक्षा दलांना हल्लेखोरांबाबत काही सुगावा लागला होता, असेही त्यांनी नमूद केले.

लतीफ भटच्‍या मृत्‍यूला पोलिसांकडून दुजोरा नाही

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुलगामच्या लारू बायपास भागात ही चकमक तेव्हा सुरू झाली, जेव्हा जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव दिला. ही मोहीम अजूनही सुरू आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर आणि मृतदेहांचा ताबा मिळाल्यानंतरच मृत्यूची पुष्टी आणि संबंधित व्यक्तींच्या ओळखीबाबत अधिक तपशील दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लतीफ भटवर १५ लाखांचे बक्षीस

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दहशतवादाच्या मार्गावर वळलेल्या लतीफ अहमद भटवर १५ लाख रुपयांचे बक्षीस होते. या वर्षी जुलै महिन्यात अनंतनागच्या लाल चौकात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्याव्यतिरिक्त, कुलगाममध्ये छत्तीसगडमधील दोन मजुरांच्या हत्येमागेही त्याचाच हात होता. उमर निसार अवघ्या १० दिवसांपूर्वीच दहशतवादी बनला होता; ११ नोव्हेंबर रोजी अखरान नौपुरा येथे सीआरपीएफ (CRPF) पथकावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो लतीफसोबत असल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

लतीफ बटच्या शोधात सुरक्षा दलांची मोठी मोहीम

कुलगाममध्ये सीआरपीएफ पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर, लतीफ बट आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान, पोलिसांनी ५०० हून अधिक संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली आणि पुढील चौकशीसाठी २० जणांना ताब्यात घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT