Vande Bharat Train : ब्रेक निकामी असूनही वंदे भारत ट्रेन ४६३ किमी धावली! लोको पायलटच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष

गंभीर त्रुटी उजेडात, दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने दिले चौकशी करण्याचे आदेश
Vande Bharat Train
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on: 
Updated on: 

Vande Bharat train brake failure : एक रिकामी 'वंदे भारत' ट्रेन तिची ब्रेक प्रणाली पूर्णपणे निकामी झालेली असतानाही सुमारे ४६३ किलोमीटरपर्यंत धावत राहिली. लोको पायलटनी वारंवार इशारा देऊनही डब्यांचे ब्रेक कार्यान्वित झाले नाहीत. झारखंडमधील हटिया येथून उत्तर प्रदेशातील झांशीकडे एक रिकामी 'चेअर कार' ट्रेन मालगाडीच्या इंजिनच्या मदतीने नेली जात असताना हा प्रकार घडला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीनंतर, दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागाने अशा अनेक त्रुटींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक नसतानाही वंदे भारत ट्रेन ४६३ किमी धावली

'पीटीआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेनची ब्रेक प्रणाली इंजिनशी योग्यरित्या जोडली नव्हती. तसेच कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले; तरीही, ट्रेनला तिचा प्रवास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी आसाममध्ये 'कोलकाता-सैरांग एक्सप्रेस' रुळावरून घसरण्याच्या काही दिवस आधी घडली या घटनेमुळे रेल्वेच्या कामकाजात होत असलेल्या कथित निष्काळजीपणाबद्दल चिंता वाढली आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Express| कोकण रेल्वे मार्गावर यशवंतपूर-मडगाव वंदे भारत सुरू

लोको पायलटच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष

७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने रांचीच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (DRM) या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींची ओळख पटवण्यास सांगितले आहे. आदेशानुसार, हटिया येथून निघाल्यानंतर लोको पायलटनी 'ब्रेक पॉवर टेस्ट' केली, तेव्हा त्यांना ब्रेक प्रणाली अत्यंत खराब स्थितीत असल्याचे आढळले. रांची येथे पोहोचल्यावर, पायलटनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवली; तरीही, ट्रेनला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. मुरी स्थानकावरून ट्रेनचा ताबा घेणाऱ्या दुसऱ्या लोको पायलटनीही संबंधित नियंत्रकांना कळवले की, ब्रेक पाईपमधील (BP) दाब कमी करून ब्रेक लावणे अशक्य आहे.

Vande Bharat Train
Bengaluru-Madgaon Vande Bharat Express | 'वंदे भारत'मुळे आंतरराज्यीय व्यापाराला मिळेल चालना

सर्व डब्यांच्या ब्रेक प्रणाली झाल्‍या होत्‍या निकामी

ट्रेन उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील दीन दयाल उपाध्याय (DDU) स्थानकावर पोहोचली, तेव्हा अधिकाऱ्यांनी रेकची (ट्रेनच्या डब्यांची) तपासणी केली. त्यांना असे आढळले की, सर्व डब्यांच्या (कोचेसच्या) ब्रेक प्रणाली विलग (आयसोलेट) केल्या गेल्या होत्या, ज्यामुळे त्या निकामी झाल्या होत्या.

Vande Bharat Train
Mumbai Madgaon Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत आता १६ डब्यांची; १० नोव्हेंबरपासून सहा दिवस धावणार

रेल्‍वे कर्मचार्‍यांचा निष्‍काळजीपणा स्‍पष्‍ट

प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, डबे आणि वॅगन देखभाल कर्मचारी, विभाग व ट्रॅक्शन नियंत्रक (सेक्शन अँड ट्रॅक्शन कंट्रोलर्स) आणि रेल्वे कर्मचारी (ट्रेन क्रू) यांच्याकडून निष्काळजीपणा झाला आहे. गाडी सुटण्यापूर्वी देखभाल कर्मचाऱ्यांनी ब्रेक्सची प्रत्यक्ष पाहणी केली नव्हती; तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांना 'वंदे भारत'च्या ब्रेक प्रणालीची पुरेशी माहिती नसल्यामुळेही ही त्रुटी घडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.